
स्वप्नातला नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी तुमचे संकल्प साकार होवोत. यशस्वी भव… यशवंत व्हा… कीर्तिवंत व्हा…! असे आशीर्वाद दासबोधाचे ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना दिले.
आदित्य ठाकरे यांनी रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन धर्माधिकारी कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासह सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी आमदार सचिन अहिर उपस्थित होते. नवा महाराष्ट्र घडवण्याकरिता जनतेच्या आशीर्वादाची शक्ती पाठीशी राहावी म्हणूनच जनआशीर्वाद यात्रेतून राज्याच्या कानाकोपऱ्यात, गावागावात जाणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. धर्माधिकारी यांच्या श्री सदस्य बैठक परिवाराच्या माध्यमातून सुरू असलेल्या पर्यावरण संवर्धनाचे कार्य अद्वितीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. स्वच्छता, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि प्लॅस्टिकमुक्ती याबाबत आदित्य ठाकरे यांची आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली. श्री सदस्य परिवाराने राबवलेले सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना खांद्याला खांदा लावून उतरेल, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
‘बेस्ट’च्या मिनी एसी बस छोटय़ा रस्त्यांवर धावणार
बेस्ट समितीने मंजूर केलेल्या फोर्स मोटर्स कंपनीच्या 500मिनी एसी डिझेल बसपैकी पाच बस सोमवारी दाखल झाल्या आहेत. क्षमता 21 प्रवाशांची असून त्यात सात प्रवासी उभ्याने प्रवास करू शकणार आहेत. ही मिनी बस वातानुकूलित असून तिच्या आसनांच्या वरच्या भागातून प्रवाशांना एसीची गारगार हवा येणार आहे. या बसेस गर्दीच्या छोटय़ा रस्त्यांवरून धावणार आहेत. या बसेसची आरटीओ नोंदणी झाल्यानंतर आठवडाभराने त्या प्रत्यक्षात सेवेत येणार आहे.




























































