
समाजातील काही घटक जातीपातींमध्ये भांडणे लावत आहेत. हिंदू धर्माची शिकवण आणि तत्त्वांविरोधात प्रचार करत आहेत. काही धर्म आदिवासी, बहुजन, भटके विमुक्त लोकांना वेगवेगळय़ा प्रकारची आमिषे दाखवून धर्मांतर करत आहेत. अखंड हिंदुस्थानसाठी धर्मांतर ही मोठी समस्या आहे. त्याला आळा घालण्यासाठी सरकारने धर्मांतर बंदीचा कायदा करावा, असे आवाहन राष्ट्रीय बंजारा परिषदेने केले आहे.
विविध मार्गांनी धर्मांतर होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. धर्माचे महत्त्व कळले तर समाज एकसंध राहील. हिंदू धर्माची संस्कृती, संस्कार आणि विचार मानवी कल्याणासाठी पोषक आणि पूरक आहेत. ज्यांचे धर्म नाहीत पण स्वतंत्र संस्कृती, संस्कार आणि रुढी परंपरा आहेत अशा बंजारा आणि इतर आदिवासी समाजाला संस्कृती समानतेनुसार धर्म शिक्षणात आणले पाहिजे. अखंड हिंदुस्थानात लहान लहान धर्मांना मान्यता द्यावी आणि त्यांचे संरक्षण करावे, असे आवाहन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष किसन राठोड यांनी केले आहे.
























































