
हरयाणा येथील झुंझुनू जिल्हयातील मलसीसर भागात कंकडेऊ गावात रामलीला सुरु असताना दशरथाची भूमिका करणारी व्यक्तीचा पुत्र वियोगाचे दृश्य सादर करत असताना मृत्यू झाला. कुंदनलाल (65) असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे तीस वर्षापूर्वी दशरथाचीच भूमिका सादर करताना कुंदनलाल यांच्या भावाचाही मृत्यू झाला होता.
या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून कुंदनलाल यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. कुंदनलाल यांचा भाऊ जगदीश हा गावातील रामलीला कार्यक्रमात भाग घ्यायचा. त्यात तो राजा दशरथाची भूमिका करायचा. पण तीस वर्षापूर्वी रामलीला सुरू असतानाच त्याचा अकस्मिक मृत्यू झाला. त्यानंतर कुंदनलाल ती भूमिका करू लागले. गेल्या तीस वर्षांपासून ते दशरथाची भूमिका करत होते. प्रेक्षकही कुंदनलाल यांच्या कामाला भरभरून दाद द्यायचे. बुधवारीही रामलीलाचा शो होता. त्यामुळे प्रेक्षकांनी नेहमीसारखी गर्दी केली होती. कुंदनलालही नेहमीप्रमाणे उत्साहात काम करत होते. पुत्रवियोगात दशरथाचा मृत्यू होतो हे दृश्य सुरू असताना अचानक कुंदनलाल खाली कोसळले. त्यामुळे हा दृश्याचाच भाग असावा असे प्रेक्षकांना वाटले व त्यांनी टाळ्या वाजवून कुंदनलाल यांना भरभरून प्रतिसाद दिला. पण कुंदनलाल हललेच नाहीत. यामुळे स्टेजवर उपस्थित असलेल्यांना शंका वाटली व त्यांनी धावत जाऊन कुंदनलाल यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तात्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
























































