
बेस्टचा वेतन करार आणि विविध प्रलंबित मागण्यासाठी पुन्हा एकदा दिवाळीपूर्वी बेस्ट वर्कर्स युनियनने 9 ऑक्टोबर रोजी संपाची नोटीस बेस्ट प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीला मुंबईकर प्रवाशांना वेठीस धरण्याचा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनने दिल्याने मुंबईकरांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
बेस्ट वर्कर्स युनियनने औद्योगिक विवाद कायद्यातील कलमांनुसार बेस्ट प्रशासनाला संपाची नोटीस दिली आहे. बेस्ट वर्कर्स युनियनने 16 मे 2016 रोजी सादर केलेले मागणीपत्र व 6 ऑगस्ट 2019 रोजी सादर केलेले पर्यायी मागण्यांचे पत्र याआधारे बेस्ट वर्कर्स युनियनबरोबर वाटाघाटीचा अंतिम करार करावा, तसेच जोपर्यंत अंतिम करार होत नाही तोपर्यंत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचार्यांना 10 हजार मासिक अंतरिम वाढ देण्यात यावी, बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, 2016 पासून ते 2019 पर्यंत मुंबई महानगरपालिका कर्मचार्यांना जाहीर झालेल्या रकमेइतके सानुग्रह अनुदान देण्यात यावे आदी मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आल्याचे नोटिसीत बेस्ट वर्कर्स युनियनने म्हटले आहे.























































