
दिवाळीला एक महिना बाकी असतानाच पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले असून पालिकेने याबाबत परिपत्रकही काढले आहे. यामुळे पालिकेत काम करणाऱ्या सुमारे 1 लाख 11 हजार कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळाली आहे.
दरवर्षी या सानुग्रह अनुदानात पालिका प्रशासन वाढ करत असते, मात्र यंदा सानुग्रह अनुदानात कोणतीही वाढ न करता गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या आगामी वेतनात ही रक्कम जमा होणार आहे.
म्हणूनच घेतला निर्णय
या वर्षी दिवाळीच्या कालावधीत विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता एक-दोन दिवसांत लागण्याची शक्यता आहे. या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सानुग्रह अनुदान मंजूर करता येणार नसल्याने प्रशासनाने मागील वर्षीप्रमाणेच कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
























































