
महिलांनी ठरवलं तर त्या कुठलाही बदल घडवून आणू शकतात. यामुळे जिल्ह्यात भगवा फडकवून जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, त्यासाठी आजच कामाला लागा असा संदेश महिला कार्यकर्त्यांना देत आपल्या स्त्री शक्तीच्या एकजुटीतून जिल्हाभर शिवसेनेचा भगवा फडकविणार असा विश्वास महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख संपदा गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
महिला-भगिनींनी कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता, सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्या पाहिजे, असंही त्या म्हणाल्या. महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा अॅड. संगिताताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीची जिल्हास्तरीय बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी संपर्क प्रमुख संपदा गडकरी, प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. दिपाताई क्षीरसागर, डॉ. सारिका क्षीरसागर, आशाताई जगताप, अॅड. फरजाना शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, बीड जिल्ह्यात जेवढा पुरूष मतदार आहे तेवढच मतदार संख्या स्त्रीयांचीही आहे. यामुळे शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आजच कामाला लागणार आहेत. प्रत्येक गावापर्यंत महिला आघाडीची शाखा आणि महिला जागृत करण्यासाठी त्यांच्या चुलीपर्यंत जावून काम करणार असून आपल्या स्त्री शक्तीच्या एकजुटीतून बीड जिल्हात शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे निश्चित केले असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी चंद्रकला बांगर, फरजाना शेख, प्रमिला माळी, उषा यादव, विद्या गुजर, कांताकान गुडे, शामल पवार, चंद्रकला वनवे राजश्री जाधव, डोइफोडे मनोरमा, सलीमा पठाण, सलमाखान, रेखा इंगोले यांच्यासह महिला आघाडीच्या जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भगिनी उपस्थित होत्या.































































