
>> प्रशांत कुलकर्णी
पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर भागात नुकत्याच झालेल्या पुरामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती ही तसे पाहिले तर बऱ्याच अंशी मानवनिर्मित आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे अक्षम्य दुर्लक्ष हे त्याचे कारण आहे. एकीकडे जरी आजकाल पर्यावरण विषयाबाबत ‘जागृती’ हा परवलीचा शब्द बनला असला तरीसुद्धा दुसरीकडे असे त्या दुष्परिणामाचे चित्र आपल्याला वारंवार दिसते. या विषयावर समाजातील अनेक संस्था, अनेक लोक त्यांचे काम करत असतात, अनेक चळवळी आजूबाजूला होत असतात. गेल्या 30-35 वर्षांपासून या विषयाकडे लक्ष जाऊन चिपको, पश्चिम घाट बचावो आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन अशी मोठी आंदोलने आणि इतरही लहानसहान, स्थानिक पातळीवरील अनेक विचारमंथन, प्लॅस्टिक बंदीसारखे उपाय वगैरे झाले. मुख्य म्हणजे पर्यावरण रक्षण कायदादेखील झाला. हे अर्थातच अतिशय तोकडे आणि तात्पुरते उपाय आहेत.
मला स्वतःला गेली दोन-अडीच दशकांपूर्वी सुरू झालेल्या किल्ले पदभ्रमणाच्या निमित्ताने निसर्गात, दऱ्याखोऱ्यात, खेडेगावातून, जंगलातून भटकण्याचा बराच योग आला. माझे त्यामुळे एकूणच पर्यावरण या विषयाकडे जाणीवपूर्वक लक्ष जाऊ लागले. त्या विषयावरील विविध पुस्तके वाचण्यात येऊ लागली. एक-दोन देवरायांसारख्या वैशिष्टय़पूर्ण ठिकाणी जायला मिळाले आणि जाणिवेच्या कक्षा रुंदवायला लागल्या. प्रबोधनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. आता अलीकडेच निसर्गायण हे दिलीप कुलकर्णी यांचे पुस्तक वाचनात आले. खरे तर हे तीस वर्षे जुने पुस्तक आहे, 1980 च्या दशकात आलेले. त्यांनी इतर पुस्तकांप्रमाणेच उपलब्ध माहितीच्या आधारे बऱ्याच गोष्टी मांडल्या आहेत, पण एक तत्त्वज्ञानात्मक विश्लेषणदेखील करण्याचा प्रयत्न केला आहे. हेच पुस्तकाचे वैशिष्टय़ आहे.
‘निसर्गायण’ या पुस्तकातून त्यांचा विचारवंतांचा पैलू दिसतो. पर्यावरण साक्षरता असलेल्या आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक पातळीवर काहीतरी करायचे असते. आपण ते करतोही. जसे ओला आणि सुका कचरा वर्गीकरण किंवा सेंद्रिय भाज्या, धान्ये यांचा वापर करणे, पाणी जपून वापरणे वगैरे आले. पण दिलीप पुलकर्णी याही पुढे जाऊन आपल्या मानसिकतेचा, समाजव्यवस्थेचा, गेल्या 250 वर्षांपासून औद्योगिकीकरणामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा विविध अंगाने आढावा घेऊन सूत्रे आपल्यापुढे मांडतात आणि वैयक्तिक पातळीवर काय काय करू शकतात हे सांगतात. आनंद म्हणजे काय? उपभोगता म्हणजे काय? गरज, चैन यांतील फरक, चंगळवाद आणि त्यामुळे निर्माण झालेला अनर्थ, ‘वापरा आणि फेका’ मानसिकता आदी पैलूंवर विवेचन करतात.
विकासाच्या नावाखाली निसर्गावर मात करण्याच्या नादात निसर्गाची हानी समाज करत आहे आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत आहे हे ते स्पष्ट करतात. ग्राहक केंद्रित अर्थव्यवस्था, अधिकाधिक वापरा, उपभोगा, अधिकाधिक निर्माण करा हे तत्त्व आणि ते कसे चुकीचे आहे आणि त्यातून निसर्ग, पर्यावरण यांचे नुकसान कसे होत आहे हे सांगतात. निसर्ग आपल्याला कायमच दोन्ही हातांनी देत असतो, पण आपण ते ओरबडून घेतो. हाव संपत नाही. सगळीकडे जो इकोफ्रेंडली गोष्टींचा बोलबाला आहे, त्या वरवरच्या उपायांच्या पलीकडे जाऊन मुळातून वृत्ती बदलली पाहिजे असे ते ठामपणे प्रतिपादन करतात आणि आपल्या जगण्यातून त्यांनी ते दाखवून दिले आहे. आपले जीवन हे जास्तीत जास्त निसर्गस्नेही कसे करता येईल ते सांगतात.
त्यांचे अजून एक पुस्तक नुकतेच (म्हणजे 2018 मध्ये) आले आहे, ते म्हणजे ‘स्वप्नामधील गावा’. त्यात दिलीप पुलकर्णी (आणि त्यांच्या पत्नी पौर्णिमा कुलकर्णी) यांनी असे निसर्गस्नेही जीवन गेली पंचवीस वर्षे कसे जगत आहेत, ते अनुभव आपल्यासोबत वाटून घेतात. पर्यावरणाचे कृतीशील विचारवंत या उक्ती आणि कृतीने ते वावरतात. पंचवीस वर्षांपूर्वी हे जोडपे कोकणात पुणे सोडून कायमचे निसर्गाच्या सान्निध्यात, निसर्गस्नेही जीवन जगण्यासाठी कुडावळे या गावी ते राहायला आले. हिंदू धर्मात गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रम सांगितला आहे, पण त्यांनी गृहस्थाश्रमात असतानाच वानप्रस्थान स्वीकारून निसर्गस्नेही जीवन जगत आहेत. विविध पुस्तके लिहून शिबिरे घडवून आणून गतिमान संतुलन नावाचे नियतकालिक चालवून, पर्यावरण जागृतीचे निसर्गस्नेही जीवन जगण्याचा म्हणजे आपले उपभोग संयमित ठेवण्याचा मार्ग समाजाला दाखवत, ते राहत आहेत.



























































