
मराठमोळ्या राहुल आवारे याने जागतिक कुस्ती अजिंक्य पद स्पर्धेत कास्य पदकाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या या मल्लाने 61 किलो गटात अमेरिकेच्या टायलर ली ग्राफचा 11-4 गुण फरकाने धुव्वा उडवून हिंदुस्थानला स्पर्धेतील पाचवे पदक जिंकून दिले. या स्पर्धेत पाच पदके मिळवण्याची हिंदुस्थानची ही पहिलीच वेळ होय, हे विशेष. याआधी 2013 साली हिंदुस्थानी मल्लांनी जागतिक स्पर्धेत 3 पदकांची कमाई केली होती.
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता कुस्तीपटू राहुल आवारे 57 किलो गटातील महाराष्ट्राचा हुकमी एक्का होय. मात्र कुस्तीतील उत्तरेकडील वर्चस्वाचा बळी ठरलेला हा मराठमोळा मल्ल दोन वेळा ऑलिम्पिक खेळण्यापासून वंचित राहिला. यंदाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत तो 61 किलो गटात सहभागी झाला होता. मात्र उपांत्य लढतीत राहुलला जॉर्जियाच्या बेका लोमाटड्जे याच्याकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे त्याच्या कास्य पदकासाठीच्या लढतींकडे तमाम कुस्तीशौकिनांच्या नजरा लागल्या होत्या. या गुणी मल्लाने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करताना कास्य पदकाच्या लढतीत अमेरिकेच्या टायलर ली ग्राफचा पराभव करून देशवासीयांना निराश केले नाही. अमेरिकन प्रतिस्पर्ध्याने पहिल्या झटक्यात दोत गुणांची कमाई केल्याने हिंदुस्थानी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र अनुभवी राहुलने दमदार पुनरागमन करत पुढच्या काही मिनिटांत 4-2 अशी आघाडी घेतली. काही मिनिटांनंतर राहुलने आपली आघाडी 10-2 अशी भक्कम केली. ग्राफने राहुलला झुंजविण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुलने 11-4ने बाजी मारीत कास्य पदकाला गवसणी घातली. राहुलने कास्य पदकाची कमाई केली असली तरी तो ज्या 61 किलो गटात खेळला तो ऑलिम्पिक गट नसल्याने त्याला ऑलिम्पिकचा कोटा मिळवता आला नाही. हिंदुस्थानने या स्पर्धेत एक रौप्य आणि चार कास्य अशा एकूण पाच पदकांची कमाई करीत पदकतालिकेत पाचवे स्थान मिळवले.
नशिबात असेल तर ऑलिम्पिक खेळेल!
राहुल खरा तर 57 किलो गटातील कुस्तीपटू होय. मात्र देशांतर्गत राजकारणाचा बळी ठरल्याने मागील दोन ऑलिम्पिक स्पर्धेत त्याची निवड होऊ शकली नाही. राहुल आता 28 वर्षांचा झालाय, आणखी किती दिवस तो 57 किलो गटात खेळणार. प्रत्येक वेळी वजन कमी करण्यासाठी त्याला खूप कसरत करावी लागते. त्यामुळे राहुलने यंदाच्या जागतिक स्पर्धेत 61 किलो गटात खेळण्याचा निर्णय घेतला. हा ऑलिम्पिक वजनी गट नाही. त्यामुळे त्याची यंदाची ऑलिम्पिक हुकलेली आहे. मात्र ऑलिम्पिक खेळणे हेच राहुल आवारेचे अंतिम स्वप्न आहे. त्याचे हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आता त्याला 65 किलो गटासाठी तयार करू. नशिबात असेल, नक्कीच राहुल ऑलिम्पिक स्पर्धेत खेळेल. – काका पवार (राहुल आवारेचे प्रशिक्षक)



























































