178 वर्षांच्या ‘थॉमस कूक’ला टाळे; 22 हजार संसार देशोधडीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 178 वर्षे जगभरातील पर्यटकांच्या सेवेत राहिलेली ‘थॉमस कूक’ कंपनी 15 हजार कोटींच्या कर्जाच्या ओझ्यामुळे रविवारी रात्री कायमचीच बंद झाली. त्यामुळे 22 हजार कर्मचाऱयांच्या नोकऱया गेल्या. कोणतीही पूर्वसूचना न देताच कंपनीने विमान सेवा बंद केल्यामुळे ब्रिटनच्या 6 लाख प्रवाशांचा विविध देशांत खोळंबा झाला. व्यवसायात आम्ही अपयशी ठरलो, अशी कबुली कंपनीचे मुख्य कार्यकारी पीटर फ्रँकहौजर यांनी दिली.

गेले काही दिवस कंपनीने कर्ज फेडण्यासाठी विविध बँकांकडून 1766 कोटी रुपये मिळवण्याचे प्रयत्न केले. नवीन गुंतवणूकदारांकडेही मदत मागितली. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने अखेर रविवारी रात्री व्यवस्थापनावर कंपनी बंद करण्याची वेळ आली. परिणामी, जगभरातील 22 हजार कर्मचाऱयांच्या नोकऱया गेल्या. यात ब्रिटनमधील 9 हजार कर्मचारी आहेत. कंपनीची विमान सेवा बंद झाल्यामुळे विविध देशांमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या 6 लाखांहून अधिक पर्यटकांचा खोळंबा झाला. याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी पीटर फ्रँकहौजर यांनी दिलगिरी व्यक्त केली. हा अत्यंत वाईट दिवस आहे. व्यवसायात आम्ही अपयशी ठरलो, अशी कबुली त्यांनी दिली.

कंपनीचा रंजक प्रवास
ब्रिटनमध्ये 19व्या शतकात मद्यपानविरोधात चळवळ उभारली गेली होती. त्या चळवळीतील समर्थकांची ट्रेनमधून ने-आण करण्यासाठी थॉमस कूक यांनी ट्रव्हल्स क्षेत्रात पाऊल टाकले आणि 1841 साली पहिली ट्रव्हल कंपनी स्थापन केली. ब्रिटिश पर्यटकांना परदेशात पर्यटनाला घेऊन जाण्याचा पहिला मान या कंपनीला मिळतो. ब्रिटनच्या प्रवाशांना ’एस्कॉर्ट ट्रिप’मधून युरोपीय देशांमध्ये घेऊन जाणारी ही पहिली कंपनी ठरली. त्यानंतर 1866 मध्ये अमेरिकेत सेवा सुरू केली व 1872 मध्ये जगभरात टूर सर्व्हिसचे जाळे विस्तारले.

16 देशांमध्ये हॉटेल, रिसॉर्टची सेवा
सर्वप्रथम ‘ट्रव्हलर्स चेक’ आणण्याचे श्रेय ‘थॉमस कूक’कडेच जाते. कंपनी दरवर्षी 16 देशांतील 19 कोटी पर्यटकांना हॉटेल, रिसॉर्ट तसेच एअरलाइन्सची सेवा पुरवत होती. कर्जामुळे या सेवा बंद झाल्या आहेत. तसेच ऑनलाइन स्पर्धेमुळे कंपनीच्या ब्रिटनमधील 600 स्टोअर्सचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

हिंदुस्थानशी संबंध नाही
दिवाळखोरीत गेलेल्या ब्रिटनच्या थॉमस कूक कंपनीचा हिंदुस्थानातील थॉमस कूक कंपनीशी काही संबंध नाही. थॉमस कूक इंडिया ही पूर्णपणे वेगळी कंपनी आहे. या कंपनीचा मालकी हक्क कॅनडातील ’फेअरफॅक्स फायनान्शिअल होल्डिंग्ज’कडे आहे, असे स्पष्टीकरण थॉमस कूक इंडिया कंपनीतर्फे देण्यात आले.

पर्यटकांच्या मदतीला ब्रिटन सरकार धावले
विविध देशांत खोळंबलेल्या जवळपास दीड लाख पर्यटकांना मायदेशी आणण्यासाठी ब्रिटन सरकारने डझनभर चार्टर्ड विमाने भाडय़ाने घेतली आहेत. दुसऱया जागतिक महायुद्धानंतर पहिल्यांदा अशाप्रकारची मोहीम हाती घेतली आहे. परिवहन सचिव ग्रॅण्ट शेप्स यांनी ही माहिती दिली. दोन वर्षांपूर्वी मोनार्क एअरलाइन्स बंद झाल्यानंतर सरकारने 1.10 लाख प्रवाशांची सोय केली होती.