
जगभरात महिलांप्रमाणेच पुरुषांवरही बलात्कार होतात. त्यासाठी अनेक देशांमध्ये कायदेही करण्यात आले आहेत. पण आपल्या देशात पुरुषांवरील लैंगिक अत्याचार करणाऱ्याविरूद्ध कठोर कारवाईची विशेष तरतूद करण्यात आलेली नाहीये. मात्र अनैसर्गिक लैंगिक छळासाठी कायदेशीर तरतूद आहे. अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला दंडासहित दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते असे सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील जितेंद्र मोहन शर्मा आणि उपेंद्र मिश्रा यांनी म्हटले आहे.
संतापजनक – वाशीत तरुणावर सामुहिक बलात्कार, केले शारिरीक अत्याचार
वकील मार्कण्डेय पंत यांनीही आपल्याकडे पुरुषांवरील बलात्कारप्रकरणी कायदेशीर तरतूद नसल्याचे सांगितले आहे. पण लग्नाचे आमिष दाखवून जर एखाद्या महिलेने पुरुषाबरोबर शरीरसंबंध ठेवले आणि नंतर लग्नास नकार दिला तर त्या पुरुषाला महिलेविरोधात फसवणुकीचा खटला दाखल करण्याचा अधिकार असल्याचे पंत यांनी सांगितले आहे.
दरम्यान, महिलांप्रमाणेच पुरुषांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातही आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी कायदेशीर तरतूद करण्यात यावी यासाठी 2013 साली सर्वेाच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आणि खासदार केटीएस तुलसी यांनी राज्यसभेत एक विधेयक सादर केले होते. त्यात फक्त महिलाच नाही तर पुरुष आणि तृतीयपंथीयही बलात्काराचे बळी ठरत असल्याने त्यासाठीही कायदेशीर तरतूद करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती.

























































