
>> उदित नारायण
लतादीदी गानकोकिळा आहेत, साक्षात सरस्वती आहेत हे मी पामराने नव्याने सांगण्याची काहीच आवश्यकता नाही! ते शाश्वत सत्य आहे.
लतादीदी यांचा मला सहवास लाभला, त्यांच्यासोबत गायला मिळालं हे माझं अहोभाग्य. पण माझ्या आयुष्यात अशी संधी कधी येईल हे मला स्वप्नातही कधी वाटलं नाही. लतादीदींचा स्वर्गीय आवाज ऐकून संगीताची आवड निर्माण झाली, दीदींना एकदा तरी प्रत्यक्ष भेटावं, त्या गातात कशा हे जाणून घ्यावं असं नेहमी वाटायचं. मी तेव्हा संगीत क्षेत्रात अगदीच नवखा होतो. एखादं फिल्म साँग गायलं तरी त्यात सराईतपणा तर नव्हताच. एका कॉन्सर्टवेळी दीदींशी भेट झाली. त्यांना पाहताच मी धन्य झालो. माझ्याकडे एक पुस्तक होतं त्यावर त्यांची स्वाक्षरी घ्यावी, चरणस्पर्श करावा म्हणून घाबरतच त्यांच्याकडे पोहचलो. बराच वेळ त्यांच्या सभोवतीची गर्दी कमी व्हावी म्हणून वाट पाहिली. दीदींचे लक्ष माझ्याकडे गेले… त्याच म्हणाल्या, ‘आइए उदित जी! ’ त्यांची सकारात्मकता पाहून मी सुखावलो… आप पीछे क्यों खडे है, आगे आइए.’ मी गोंधळून, बावचळून उभा होतो. हातातील पुस्तक दीदीपर्यंत न जाता हातातच राहिले. त्यांनी माझी मनस्थिती ओळखली. उदित, तुम्ही स्वतःला लहान-कमी समजू नका. तुम्ही ‘बडे दिलवाला’ या फिल्ममध्ये किती छान गायलात. त्यांनी मी गायलेलं एक गीत-एक ओळ गायलीदेखील. मी थक्क झालो. त्या पुढे म्हणाल्या, ‘तुमचा आवाज ओरिजिनल आहे. क्लासिकलचा बेस पक्का करा, रियाझ करत राहा.’ त्यांनी मला दिलेली ओळख मला दिलेला सल्ला अत्तराच्या कुपीसारखा आयुष्यभर सुगंध पुरवणारा आहे.
माझ्या सुदैवाने मला दीदींसोबत अनेक फिल्मसाठी प्ले बॅक देण्याची संधी मिळत गेली. दीदी खरं म्हणजे नंबर गायिका. त्यांचे गाणे प्रतिथयश निर्मात्याकडे. माझी तिथवर ‘पोच’ नव्हतीच, पण यशराजसारख्या दिग्गज बॅनरमध्ये मला त्यांच्या बरोबरीने प्ले बॅकची संधी मिळाली आणि आमची सगळीच ‘डुएटस’ गाजलीत. यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा यश चोप्रा यांना दीदी भाऊ मानत आणि इथे गातांना दीदींना घरच्यासारखं वाटत असे. त्या मोकळेपणाने वागत. एरवी गंभीर वाटणाऱया दीदींचं एक मिश्कील, खेळकर रूप मी यशराजमध्ये पाहिलेय. रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये दरारा वाटणाऱया दीदी याच का? असा मला प्रश्न पडे. माझा पोशाख बघून त्या चेष्टेने म्हणत ‘यशभय्या, आज उदितने पहना कुडता देखिये कितना ब्राइट है, बहुत मूड में नजर आ रहे है उदित. गाना भी उतना ही सुरीला गाएंगे.’ अशी थट्टामस्करी दीदी करत आणि गाण्यांमध्ये अशी मस्ती-आनंद अलवार उतरे. यशराजमध्ये मी आणि दीदींनी गायलेली गाणी माझ्या कारकीर्दीतला मी सुवर्णकाळ मानतो.
माझा वाढदिवस 1 डिसेंबरला असतो. काही वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवशी आमची कॉन्सर्ट होती. बहुधा हैदराबाद अथवा कोलकाता शहर होतं. कॉन्सर्ट दीदी असताना न रंगली तर नवल. कॉन्सर्ट संपताना दीदींनी स्टेजवर येऊन रसिकांना माझा वाढदिवस असल्याचे जाहीर केलं आणि गोल्ड चेन मला भेट दिली. हा माझ्यासाठी अलंकार नसून सरस्वतीने दिलेला आशीर्वाद आहे, असे मी मानतो.
शब्दांकन – पूजा सामंत



























































