
हिंदुस्थानचा माजी क्रिकेट कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांची शुक्रवारी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोहम्मद अझरुद्दीन यांना सर्वात जास्त म्हणजेच 173 मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी प्रकाश चंद यांना 73 मतेच मिळाली.
मोहम्मद अझरुद्दीन यांनी गेल्या आठवडय़ात हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. या पदासाठी एकूण 12 जणांनी अर्ज केले होते. परंतु 9 जणांनी अर्ज मागे घेतले. मोहम्मद अझरुद्दीन या वेळी म्हणाले, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने याआधी खूप अडचणी सहन केल्या आहेत. यात बदल करणे, खेळाडूंच्या समस्या सोडवणे हेच माझ्यापुढील आव्हान असणार आहे.
हरमनप्रीत, मितालीच हिंदुस्थानच्या कर्णधार
हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाची घोषणा शुक्रवारी सूरतमध्ये करण्यात आली. हिंदुस्थानचा संघ नोव्हेंबर महिन्यात वेस्ट इंडीज दौऱयावर जाणार असून यासाठी वन डे मालिकेसाठी मिताली राज आणि ट्वेण्टी-20 मालिकेसाठी हरमनप्रीत कौर यांच्याकडेच नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
हिंदुस्थानचा संघ या दौऱयात तीन वन डे व पाच ट्वेण्टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. उभय देशांचे वन डे सामने ऑण्टिग्वा येथे तर ट्वेण्टी-20 सेंट लुशिया व गयाना येथे होणार आहेत. या संघात स्मृती मंधाना, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रिग्स व अनुजा पाटील या महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

























































