वन्य जीवांची सखीसोबती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुर्गेश आखाडे

वन्यप्राण्यांवर उपचार करणारे, त्यांच्या सहवासात राहणारे प्राणीमित्र अतिशय दुर्मिळ असतात. असे भटके किंवा वन्यजीव दिसले तर क्षणार्धात दगड उचलणारे आपण पहातो. पण त्याच दगडाने एखादा प्राणी जखमी झाला तर त्याच्यावर उपचार करणारी माणसं म्हणजे या वन्यजीवांसाठी देवदूतच. पंतप्रधान ग्रामसडक कार्यालयात कनिष्ठ अभियंता पदावर काम करणाऱया चित्रा सावंत या अशाच एक वन्यजीवांच्या सखसोबती.

कुत्र्या-मांजरावर जिवाडपाड प्रेम करणारे आपण आजूबाजूला अनेक जण पहातो. अगदी माणसांचे जसे फॅमिली डॉक्टर  असतात असे कुत्र्या-मांजराचे पण डॉक्टर आपण पहातो. पण कधी घुबड, घार, कोल्हा यांच्यावर एखादा मनुष्य उपचार करतोय  असं आपण पाहिलयं का? खरतरं ती व्यक्ती प्राण्यांची डॉक्टर नाही आहे. त्याला प्राण्यांचे आजार दुखापत कळत नाहीत, पण वेदना मात्र जाणवतात अशी व्यक्ती म्हणजेच प्राणीमित्र. अशाच रत्नागिरीतील प्राणीमित्र चित्रा सावंत.

प्राणीमित्र अशी बिरुदावली त्यांनी कधीच मिरवली नाही किंवा प्राण्यांवर उपचार केलं म्हणून कधी त्याचा प्रसिद्धीचा बोभाटा केला नाही त्यामुळे फार कमी लोकांना चित्रा सावंत यांचे प्राणीप्रेम माहीत आहे. पण त्यांचे प्राणीप्रेम पाहिले की, अनेक जण थक्क होतात, कारण लोक निषिद्ध मानतात याची परवा न करता जखमी घुबडावर उपचार करून त्याला खाऊ पिऊ घालणं. जखमी घारीवरी उपचार करत तिला पुन्हा उंच भरारी घेऊ देणे हे खरं प्राणीप्रेम. वन्यप्राण्यांवर उपचार करणारे, त्यांच्या सहवासात राहणारे प्राणीमित्र अतिशय दुर्मिळ असतात. असे भटके किंवा वन्यजीव दिसले तर क्षणार्धात दगड उचलणारे आपण पहातो. पण त्याच दगडाने एखादा प्राणी जखमी झाला तर त्याच्यावर उपचार करणाऱयांपैकी एक अशा चित्रा सावंत आहेत.

पंतप्रधान ग्रामसडक कार्यालयात कनिष्ठ अभियंता पदावर काम करणाऱया चित्रा सावंत यांना प्राण्यांविषयी प्रचंड कुतूहल आणि आपुलकी आहे. साधारण सातवी-आठवीत शिकत असतानाच त्यांनी शाळेतून घरी येताना रस्त्यात त्यांना जखमी अवस्थेत घार दिसली. त्या घारीच्या जखमेची वेदना त्यांना जाणवली म्हणून त्यांनी ती घार घरात आणली. घरात आणलेली घार पाहून कुणीही रागावलं नाही त्यामुळेच चित्रा सावंत यांच्या प्राणीप्रेमाला प्रोत्साहन मिळाले. घरातील कुणालाच जखमी घारीवर काय उपचार करायचे कोणालाच माहिती नव्हते. त्या गुरांच्या डॉक्टरकडे घेऊन गेल्या पण तिथेही कोणाला माहिती नव्हती. मग घरीच उपचार केल्यावर ती घार बरी झाली आणि उडून गेली.

प्राण्याविषयी एक आपुलकी चित्रा सावंत यांच्या मनात निर्माण होत होती. एक दिवस तर त्यांना 15 दिवसांचे घुबडाचे पिलू जखमी अवस्थेत सापडले. त्याला घरी आणून हे बघा घुबडाचे पिल्लू असे त्यांनी घरातील सर्वांना सांगितले. त्या घुबडाच्या पिलावर त्यांनी एखादा चिमुकल्या बाळावर उपचार करावेत असे उपचार केले. प्राण्यांची भाषा आपल्याला कळत नसली किंवा आपली भाषा त्यांना उमगत नसली तरी प्राणी माणसांची दोस्ती करतात कारण त्यांना भावनिक भाषा समजते. ते घुबडाचे पिल्लू चित्रा सावंत यांच्या घरी तीन-चार महिने वाढले. काही दिवसांतच मिस्टर घुबड हे त्यांच्या घरातले पाहुणेच ठरले होते. त्याला खायला काय घालायचे हा प्रश्न चित्रा सावंत यांना पडला. त्या शाकाहारी असल्याने मासे-मटण या गोष्टी त्यांच्यापासून दूर होत्या. पण त्यांनी घरात मासे आणायला सुरुवात केली ती घुबडासाठीच. घुबडाला गोडय़ा पाण्यातले मासे आवडतात, पण गोडय़ा पाण्यातले मासे आणायचे कोठून? मग संगमेश्वरहून खास गोडय़ा पाण्यातले मासे आणून त्या घुबडाचा पाहुणचारच केला जात होता. गोडय़ा पाण्यातले ते मासे एका थाळीत टाकायचे मग ते घुबड थाळीत ठेवलेल्या माशांवर ताव मारायचे.

विशेष म्हणजे हे घुबड रोज आंघोळ करायचे त्याच्यासाठी एका भांडय़ात आंघोळीचे पाणी ठेवले जायचे मग घुबाडाला गण्या नावाने हाक मारून आंघोळ कर असे सांगताच ते त्या भांडय़ातील पाण्यात मनसोक्त डुंबायचे. हे घुबडाचे पिल्लू बऱयापैकी मोठे झाल्यावर त्यांनी सोडून दिले. घुबड उडून गेले तरी प्राण्यांचे त्यांच्या घरी आगमन होतच होतं.

चित्रा सावंत यांचे प्राणीप्रेमाचे संस्कार त्यांच्या मुलांमध्येही उतरले होते. एक दिवस त्या राहात असलेल्या परिसरात एक जखमी कोल्हा विव्हळत होता आणि सात-आठ कुत्री त्याच्यावर हल्ला करत होती. चित्रा सावंत यांना त्यांचा मुलगा राज याने फोन करून आपल्या घरासमोरच  कोह्याला कुत्रे मारत असल्याचे सांगितले. चित्रा सावंत कार्यालयात काम करत होत्या. त्यांनी मुलाला सांगितले की, कुत्र्यांना दूर हाकव तोपर्यंत मी पोहोचतेच.

काही मिनिटांत चित्रा सावंत तिथे पोहचल्या तेव्हा कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे कोल्हा चवताळला होता. सात आठजणांनी त्या कोल्ह्याला कसेतरी घरी आणले. त्याच्यावर उपचार केल्यावर त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. जखमी कोल्ह्याचे त्यांनी प्राण वाचवले. त्यानंतर त्यांना एक बगळाही जखमी अवस्थेत सापडला. त्याला त्या डॉक्टरकडे घेऊन गेल्या. कुत्र्यांचे डॉक्टरही दवाखान्यात आलेल्या बगळय़ाला पाहून अचंबित झाले होते. अलीकडेच मांडवीतून त्यांना एक फोन आला. आमच्या इथे जखमी घुबड पडले आहे, पण त्या घुबडाला कोणी हात लावायला तयार नव्हते. भरपावसात घुबड गारठले होते. त्यांनी ते घुबड एका खोक्यात ठेवून घरी आणले आणि त्याच्यावर उपचार करून त्याला बरं करून सोडून दिले. काही दिवसांपूर्वीच चंपक मैदान येथे त्यांना घुबडाचे पिल्लू दिसले. हे पिल्लू इथंच राहिले तर कावळे त्याला मारतील अशी शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकली. पण ते पिल्लू कशात घेणार हा प्रश्न होताच. क्षणाचाही विचार न करता त्यांनी आपल्या ओढणीत त्या इवल्याशा पिलाला गुंडाळताच त्या पिलाला मायेची…माणुसकीची ऊब मिळाली. मग ते पिल्लू दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेच्या हातात देऊन त्या घरी आल्या. त्याच्यावर उपचार केले.

चित्रा सावंत यांची वन्यप्राण्याशी एक मैत्री झाली आहे. सलीम अली यांच्या इंडियन बर्डस् या पुस्तकाच्या वाचनातून त्यांना पक्ष्याविषयी खूप माहिती मिळाली आहे. दुपारी जेवणाच्या वेळी त्यांच्या खिडकीवर कावळय़ांचा कावकाव आणि चिमण्यांचा चिवचिवाट सुरू असतो. ही चिऊ-काऊ मध्यान्ह भोजनासाठी खिडकीवर न चुकता येतात. त्यांना खायला टाकलं की मग ते निघून जातात.

[email protected]