शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल! कोणत्याही क्षणी युतीची घोषणा!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या मेळाव्यासाठी 288 इच्छुकांना बोलावलं म्हणजे युती तुटली असे नाही. अमित शहा आणि माझ्यात युतीची बोलणी व्यवस्थित सुरू आहेत. एक-दोन दिवसांत युतीची घोषणा होईल. मला खेचाखेचीचं राजकारण करायचं नाही. आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे. महाराष्ट्रावर भगवा फडकवणारच, असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत व्यक्त केला.

आगामी निवडणुकीसाठी 288 मतदारसंघांतील शिवसेनेतील इच्छुक उमेदवारांचा मेळावा शनिवारी रंगशारदा येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शहा आणि माझी बोलणी सुरू आहेत. कोणत्या जागांवर कोण अधिक जिंकण्याची शक्यता आहे याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेची यादी जशी आलेली नाही त्याचप्रमाणे भाजपचीही यादी अद्याप जाहीर झालेली नाही. लवकरच युतीची घोषणा होईल.

गनिमी कावा गनिमांसाठी; मित्रांसाठी नाही
गनिमी कावा हा गनिमांसाठी असतो, मित्रांसाठी नाही. त्यामुळे भाजपसोबत आपला गनिमी कावा नाही. युती झाली तरी समोर कोणीच नाही असे समजू नका. कारण समोर कोणी नसतो तेव्हा अधिक धोका असतो. अशावेळी बेसावध येणाऱया शत्रूसाठी हा गनिमी कावा वापरा. भाजपसाठी जागा घोषित झाल्या तरी त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

होय, मला सत्ता हवी आहे!
शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदाच्या तख्तावर बसवेन
होय, मला सत्ता हवी आहे, पण ती जनतेची सेवा करण्यासाठी. शेतकऱयांना चिंतामुक्त करण्यासाठी; शेतकरी, कामगार, भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी. अखेरच्या क्षणी शिवसेनाप्रमुखांचा हात हातात घेऊन मी वचन दिलं आह़े ते वचन मी पूर्ण करणारच. वाटेल त्या टोकाला जाईन, पण एक दिवस शिवसैनिक मुख्यमंत्री पदाच्या तख्तावर बसवणार, असा निर्धार करतानाच उद्धव ठाकरे यांनी मी राजकारण सोडणार नाही… शेती करणार नाही… माझा शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन, असा जबरदस्त टोलाही लगावला.

नवरात्रीत एकत्र आरती करूया!
गणेशोत्सव व्यवस्थित पार पडला. आता नवरात्रोत्सव सुरू होणार असून आता मंडप मोडायला मूर्ख नाही. त्यामुळे एकत्र मिळून जगदंबेची आरती करूया, असे आवाहन करतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुकीचे अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे. शिवसेनेने सर्व मतदारसंघांची तयारी केली आहे. त्यानुसार युतीत ज्या जागा वाटय़ाला येतील त्यासाठी तयारी सुरू आहेच; पण ज्या जागा भाजपला घोषित होतील त्यासाठीही ही तयारी कामी येईल.

बंडखोरी करू नका; माणसं तुटत नाहीत, अंतःकरण तुटतं.
बंडखोरी करू नका असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी, हवं तर तुम्ही इथे या नि उमेदवारांची निवड करा असेही आवाहन केले. यावेळी साहेब, तुम्हीच निवड करा असे शिवसैनिकांकडून सांगण्यात आले. यावर पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुकीवेळी उमेदवार निवडण्याचा काळ हा माझ्यासाठी अधिक क्लेशदायक असतो. कारण उमेदवारी न मिळाल्याने माणसं तुटतात; पण प्रत्यक्षात ही माणसं तुटत नाहीत, तर अंतःकरण तुटतं. हीच माणसं नंतर सगळीकडे जाऊन पुन्हा येतात आणि पुन्हा चुकलो असे सांगतात. तेव्हा सर्वांनी एकच निर्धार करा की, मी गद्दारी करणार नाही. शिवसेनेचा माझा भगवा मी महाराष्ट्राच्या विधिमंडळावर फडकवणारच.