मेर्वीत बिबट्याचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यातील पावस परिसरात बिबट्याचा धूमाकूळ सुरुच आहे. सोमवारी सकाळी सहा वाजता मेर्वी येथील शेतात पंप सुरू करायला गेलेल्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला.

पावस, गणेशगुळे, मेर्वी परिसरात गेले सहा महिने बिबट्याचा धूमाकूळ सुरु आहे. मेर्वी गावातील शेतकरी प्रेमानंद कृष्णा आंब्रे (40) हे आज सोमवारी सकाळी सहा वाजता शेतातील पंप सुरू करायला गेलेले असताना शेताच्या बांधावरून पाठीमागून येत बिबट्याने प्रेमानंद यांच्या डोक्यावर पंजा मारत झडप घेतली. प्रेमानंद यांनी बिबट्याचा प्रतिकार करत त्याच्याशी झुंज दिली. बिबट्याने पुन्हा त्यांच्या पाठीवर पंजा मारून जखमी केले. बिबट्याबरोबर झुंज देत त्यांनी त्याला दूर ढकलले. त्याचवेळी चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्या पायावर जोरदार पंजा मारला.

जखमी अवस्थेत प्रेमानंद आंब्रे शेतातून बाहेर आले वर घरी पोहोचले. नातेवाईकांनी त्यांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. गावचे सरपंच शशिकांत म्हादये, शिवसेनेचे विभागप्रमुख रविकीरण तोडणकर आणि संदीप बिर्जे यांनी रूग्णालयात जाऊन जखमी प्रेमानंद आंब्रे यांची विचारपूस केली.

शिवसेनेचे विभागप्रमुख छेडणार उपोषण
गेल्या सहा महिन्यात पावस, गणेशगुळे, मेर्वी परिसरात दहा ते बारा ग्रामस्थांवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्यानंतरही वनविभाग बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरला आहे. शिवसेनेचे पावस विभागप्रमुख रविकिरण तोडणकर यांनी सांगितले की, मागच्यावेळी सहा जणांवर बिबट्याने हल्ला केला. त्यावेळी वनविभागाने गावात बैठक घेतली होती. आम्ही नागपूरला सर्व माहितीचा प्रस्ताव पाठवला असून तिथून तो कोल्हापूरला येईल व त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी बोरिवली येथून एक पथक येईल असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. अजून किती दिवस आम्हाला पथक येण्याची वाट पहावी लागणार आहे. अजून पंधरा दिवसाची वनविभागाला आम्ही मुदत देत असून तोपर्यंत बिबट्याला पकडणारे पथक न आल्यास मी वनविभागाच्या रत्नागिरी कार्यालयाबाहेर उपोषण छेडणार असल्याचा इशारा रविकिरण तोडणकर यांनी दिला आहे.