
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आलेल्या उमेदवाराला दंड आकारण्यात आला आहे. मच्छिंद्र देवराव मुंगळे हे इच्छुक उमेदवार नेवासा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. त्यावेळी 10 हजार रुपयांची अनामत रक्कम भरण्यासाठी त्यांनी ही रक्कम सुट्ट्या पैशांच्या स्वरुपात प्लॅस्टिक पिशवीत आणली होती.
एका चित्रपटात अनामत रक्कम म्हणून सुटे पैसे उमेदवार घेऊन जातो, असे दाखवण्यात आले होते. त्याचप्रमाणे स्टंट करणे या उमेदवाराच्या अंगलट आले असून त्यांना पाच हजाराचा दंड भरावा लागला आहे. या उमेदवाराने 10 हजाराची अनामत रक्कम सुट्ट्या पैशांत प्लॅस्टिकच्या पिशवीत आणली होती. राज्यात प्लॅस्टिकवर बंदी असताना त्यांनी प्लॅस्टिक पिशवीतून रक्कम आणल्याने पाच हजाराचा दंड आकारण्यात आला आहे. नेवासा नगरपंचायतीचे अधिकारी समीर शेख यांनी कारवाई केली.


























































