खडकपूर्णाच्या प्रवाहात युवक वाहून गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

खडकपूर्णा नदीच्या प्रवाहात एक युवक वाहून गेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. युवक आपल्या मित्रांसह चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पातून विसर्ग होत असलेल्या पाण्यात पोहत असताना ही घटना घडली. त्या युवकाला शोधण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. मात्र, सदर युवक सापडला नसल्याने पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.

श्री व्यंकटेश महाविद्यालयात शिकणाऱ्या देऊळगाव मही येथील विजयराज नाना राजे हा युवक आपल्या दोन मित्रांसह खडकपूर्णा प्रकल्पातून विसर्ग होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात नदीमध्ये पोहत होता. खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात होता. पाण्याच्या या प्रवाहात पोहताना विजयराज वाहून गेल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले. यावेळी ते पाण्याबाहेर आले आणि आरडाओरड केली. सुनील सानप व मयूर पुजारी यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला घटनेची माहिती दिली. देऊळगाव मही येथील काही युवक घटनास्थळी पोहोचले व शोधकार्य सुरू केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.डी. भातनाते, महसूल मंडळ अधिकारी रवींद्र काकडे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि शोधकार्याला गती दिली. मात्र, सायंकाळपर्यंत युवक सापडला नाही. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने विजयराज वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.