
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज तमाम शिवसैनिकांच्या परवानगीने वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले तेव्हा टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला. ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या गगनभेदी घोषणांच्या गजरात निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या शिवसेनेच्या या छाव्याचे उदंड स्वागत झाले!
लाला लजपतराय कॉलेजच्या सभागृहात विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याकडे केवळ शिवसैनिकांचेच नव्हे तर अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. कारण हाच तो मेळावा आणि हीच ती वेळ, ज्यात एक ऐतिहासिक घोषणा होण्याचा अंदाज होता. प्रचंड उत्साहाने भारलेल्या शिवसैनिकांनी सभागृह तुडुंब भरले होते. ‘शिवसेना झिंदाबाद’चा जयघोष सुरू होता आणि ती वेळ आली… ऐतिहासिक घोषणा झाली… ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि माझ्या आजी–आजोबांच्या आशीर्वादाने व शिवसैनिकांच्या, वरळी विभागातील सर्व पदाधिकाऱयांच्या आणि येथील विद्यमान आमदार सुनील शिंदे यांच्या परवानगीने मी वरळीतून निवडणूक लढवणार, अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी करताच सभागृह टाळय़ांच्या प्रचंड कडकडाटाने दणाणून गेले. शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.
आदित्य ठाकरे म्हणाले, हा ऐतिहासिक टप्पा आहे. मी मोठी झेप घेत आहे; पण ही झेप घेताना तमाम शिवसैनिक माझ्या सोबत आहेत. गेली दहा वर्षं मी महाराष्ट्र पिंजून काढत आहे तो प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा, जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी. शिवसैनिकांनो, आता आपली जबाबदारी आहे ती म्हणजे जे आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत ते माझ्यापर्यंत पोहोचविण्याची.
वरळीचा विकास तर करणारच,महाराष्ट्राला जागतिक पातळीवर नेणार!
वरळीचा विकास तर करणारच, पण महाराष्ट्राला जागतिक पातळीवर नेणाऱ संपूर्ण महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांचं स्वप्न साकार कारायचं आहे. तेव्हा महाराष्ट्रासाठी काम करीत राहणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
हीच ती वेळ आहे
मला निवडणूक लढवायची आहे ती आमदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री होण्यासाठी नाही तर जनतेचे स्वप्न साकार करण्यासाठी. तेव्हा हीच ती वेळ आहे महाराष्ट्र दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदूषणमुक्त करण्याची. हीच ती वेळ आहे शेतकऱयांना कर्जमुक्त करण्याची. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याची. हीच ती वेळ आहे सुजलाम् सुफलाम् आणि भगवा महाराष्ट्र घडविण्याची. हीच ती वेळ आहे शिवसेनेला विदर्भ, मराठवाडा, संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याची. हीच ती वेळ आहे सर्व भेदभाव विसरून एकत्र येण्याची… नवा महाराष्ट्र घडविण्याची, असे सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी तुम्ही लढायला तयार आहात ना, जिंकायला तयार आहात ना, असा सवाल करताच शिवसैनिकांनी हात उंचावून होकार दिला आणि एकसुरात जयघोष केला.
‘‘मी केवळ वरळीतून निवडणूक लढवत नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची निवडणूक लढतोय. विधानसभेच्या प्रत्येक जागेवर मी उभा आहे आणि मला जिंकायचं आहे. तेव्हा राज्यभरात कोणीही समोर उभं राहिलं तरी आपण लढायचं आणि जिंकायचं.’’ –आदित्य ठाकरे
विजय संकल्प मेळाव्यात निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी सौ. रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या. यावेळी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर व विश्वस्त संजय सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.
आशीर्वाद आणि शुभेच्छा!
आदित्य ठाकरे यांच्या घोषणेमुळे अवघ्या वातावरणात एक जबरदस्त ऊर्जा सळसळू लागली होती. शिवसैनिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आदित्य ठाकरे यांनी आई सौ. रश्मी ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. भाऊ तेजस याने घट्ट आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या. आमदार सुनील शिंदे यांनीही पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली.
हीच ती वेळ आहे महाराष्ट्र दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदूषणमुक्त करण्याची. हीच ती वेळ आहे शेतकऱयांना कर्जमुक्त करण्याची. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याची. हीच ती वेळ आहे सुजलाम् सुफलाम् आणि भगवा महाराष्ट्र घडविण्याची.
हेच आमचे सूर्ययान!
काही दिवसांपूर्वी आपले चांद्रयान तांत्रिक बिघाडामुळे चंद्रावर उतरू शकले नाही. पण शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे सूर्ययान आहे. ते 21 तारखेनंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अत्यंत सुरक्षित उतरल्याशिवाय राहणार नाही, असे प्रशंसोद्गार शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी या वेळी काढले. शिवसेनेचे सर्व शिलेदार आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असे ते म्हणाले.
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची जबाबदारी शिरावर घेतल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने खासदार राऊत यांनी या वेळी आदित्य ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. हाजीअली, महालक्ष्मी आणि महाराष्ट्राचा आशीर्वाद आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी असून त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हाऊ दी ऍडी
आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर राज्यात आणि देशात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही आदित्य ठाकरे यांना त्यांच्या प्रचारासाठी बोलवतील आणि त्या वेळी आम्हीही ‘हाऊ दी ऍडी’ अशा घोषणा देऊ, असे खासदार राऊत या वेळी बोलताच सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांना दाद दिली.
याप्रसंगी शिवसेना नेते मनोहर जोशी, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, शिवसेना उपनेत्या मीना कांबळी, प्रियांका चतुर्वेदी, फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत आमदार विलास पोतनीस, सूरज चव्हाण, माजी आमदार सचिन अहिर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, पांडुरंग सकपाळ, नगरसेविका किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.
वरळीचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल– आमदार सुनील शिंदे
वरळीचे शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना या वेळी पुष्पहार घालून आणि तलवार भेट देऊन अभिनंदन केले. ज्या मतदारसंघाचे मी पाच वर्षे प्रतिनिधित्व केले त्या वरळीतून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरातील व्यक्तीने निवडणूक लढवणे हा एक ऐतिहासिक निर्णय असून वरळीचे नाव आता जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आदित्य ठाकरे यांनी वरळीचे आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, अशी तमाम वरळीकरांचीही भावना होती, असे ते म्हणाले.




























































