लेख – दारूच्या व्यसनमुक्तीचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम ([email protected])

हिंदुस्थान जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा दारू बाजार आहे. देशात दरव्यक्ती अल्कोहोलचे सेवन दरवर्षी 4.6 लिटर आहे आणि हे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. दरवर्षी 2.6 लाख हिंदुस्थानी दारूमुळे मरत आहेत. देशासमोर दारूच्या व्यसनमुक्तीचे मोठे आव्हान उभे आहे. जागतिक अल्कोहोल निषेध दिन म्हणून 2 ऑक्टोबर हा जागतिक स्तरावर साजरा केला जातो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचीदेखील आज जयंती. त्यांनी जनतेला व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश दिला आहे. त्यानिमित्त हा लेख.

जगातील सुमारे 23 कोटी 70 लाख पुरुष आणि 4 कोटी 60 लाख महिला दारूमुळे होणाऱ्या आजारांना बळी पडतात. जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की, जगभरात दरवर्षी दारूमुळे 33 लाख लोक मरण पावतात, दर 10 सेकंदाला एक मृत्यू होतो. हे प्रमाण एड्स, हिंसाचार आणि रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूपेक्षाही जास्त आहे. रशियामध्ये बहुतेक मद्यपान केले जाते, ज्यामुळे दर वर्षी पाच लाख लोक मरतात. अल्कोहोल अँड हेल्थविषयी युनायटेड नेशन्सच्या आरोग्य संस्थेच्या नवीन अहवालात असे म्हटले आहे की, जगभरात 20 पैकी एक मृत्यू दारूमुळे होतो.

हिंदुस्थान जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा दारू बाजार आहे. देशात दरव्यक्ती अल्कोहोलचे सेवन दरवर्षी 4.6 लिटर आहे आणि हे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. दरवर्षी 2.6 लाख हिंदुस्थानी दारूमुळे मरत आहेत. यात मद्यपान करून ड्रायव्हिंग  करताना होणाऱ्या अपघातात होणारे मृत्यू, यकृत समस्या, कर्करोग, यासारखी कारणे आहेत. तरीसुद्धा, देशभरातील सुमारे 15 टक्के लोक मद्यपान करतात, पाच जणांपैकी एक व्यक्ती मद्यपान करतो. एका सर्वेक्षणानुसार देशातील 19 टक्के लोकांना दारूचे व्यसन लागले आहे. तर 10 ते 75 वर्षें वयोगटातील 2.7 टक्के लोकांना दररोज किमान एक पेग तरी आवश्यक असते असे दिसून आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे दहा वर्षांची मुलेदेखील अमली पदार्थ सेवन करण्यात गुंतलेली आहेत. हिंदुस्थानची दारूची बाजारपेठ 8.8 टक्क्यांच्या सीएजीआरने वाढत आहे आणि सन 2022पर्यंत ते 16.8 अब्ज लिटरपर्यंत पोचतील अशी शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तेलंगाना, केरळ, कर्नाटक, सिक्कीम, हरयाणा आणि हिमाचल प्रदेश ही हिंदुस्थानातील सर्वाधिक मद्यपान करणारी राज्ये आहेत.

नशा कोणतीही असो ती फक्त जीवन बरबाद करते. मद्यपान केल्याने मेंदूच्या डोपामाईनची पातळी 40 टक्क्यांवरून 360 टक्क्यांपर्यंत वाढते. ज्या कुटुंबात मद्यपी व्यक्ती आहे ते कुटुंब नेहमी गुदमरल्यासारखे जीवन जगते. अशी कुटुंबे तणाव, शोक, वादविवाद, कलह, नकारात्मकता, अपमानास्पद वागणे, औदासिन्य, आजारपण, आर्थिक आणि सामाजिक समस्या, निकृष्ट दर्जा यासारख्या समस्यांपासून ग्रस्त असतात. अशा कुटुंबांमध्ये गरजा पूर्ण करण्याचे साधन कमी असते. मद्यपी स्वतःला वाया घालवत नाही, तर संपूर्ण कुटुंबास दुःखाच्या अंधारात ढकलतो आणि जर मद्यपी कुटुंबाचा मुखंड असेल तर कुटुंबाचे आयुष्य नरक आहे. आपण बऱ्याचदा समाजात असे लोक पाहतो जे दररोज मद्यपान करतात आणि आपल्या मुलांना, स्त्रियांना मारहाण करतात. नशा केल्यास मानवी बुद्धीवरून नियंत्रण जाते, हत्या, आत्महत्या यासारखे नकारात्मक विचार येतात.

देशात असे कोणतेही राज्य शिल्लक नाही जिथे विषारी दारूमुळे मृत्यू झालेला नाही. गेल्या काही वर्षांत विषारी दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भयंकर वाढ झाली आहे. शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. एकेका दुर्घटनेत 150 ते 200 लोकांचा बळी गेला आहे. युरिया आणि ऑक्सिटॉसीनसारख्या रासायनिक पदार्थांना दारूमध्ये मिळवल्यामुळे मेथील अल्कोहोल तयार होते. विषारी बेसरबेलसारखी पानेदेखील मिळवतात. ऑक्सिटॉसीन याला अधिक मादक पदार्थ बनवण्यासाठी मिळवले जाते. मात्र त्यामुळे ते पिणाऱ्याचा मृत्यू होतो.

अल्कोहोलमुळे शरीरात व्हिटॅमीन बी-12 कमी होते. कॅल्शियम आणि व्हिटॅमीन-डी शोषण प्रतिबंधित करते. औदासिन्य, मेंदूचा कमकुवतपणा, हार्मोनल बॅलेन्सदेखील बिघडतो, ज्यामुळे हृदयरोग, यकृत सिरॉयसीस, यकृत चिडचिड आणि जळजळ इ. घातक रोग  होऊ शकतात. शिवाय उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते आणि हृदयाच्या स्नायूंना नुकसान होते. त्यामुळे तोंडाचा कर्करोग, घशाचा वरचा भाग, स्वरयंत्र, अन्ननलिका, स्तनाचा त्रास होऊ शकतो. प्रत्येक वर्षी होणाऱ्या 30 हजार कर्करोग रुग्णांच्या मृत्यूच्या मागे दारूचा वापरसुद्धा एक कारण आहे. मद्यपान केल्यामुळे अनेक कर्करोगासह 200पेक्षा जास्त आरोग्याशी संबंधित आजार होतात. जागतिक पातळीवर 2016 मध्ये मद्यपान संबंधित मृत्यूची संख्या सुमारे 30 लाख होती.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जाहीर केलेल्या अल्कोहोल अँड हेल्थ 2018च्या ग्लोबल स्टेटस रिपोर्टनुसार 2005 ते 2016 या वेळेत हिंदुस्थानात दरडोई अल्कोहोलचे प्रमाण दोन पट वाढले आहे. हिंदुस्थानींनी 2005मध्ये 2.4 लिटर मद्यपान केले, ते 2010मध्ये 4.3 लिटर आणि 2016मध्ये 7.7 लिटरपर्यंत वाढले. सन 2010 ते 2017 या कालावधीत हिंदुस्थानातील वार्षिक अल्कोहोलच्या वापरामध्ये 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या अभ्यासात असे दिसून आले आहे की 1990पासून जगभरात दरवर्षी अल्कोहोलचे प्रमाण 70 टक्क्यांनी वाढले आहे. संशोधकांनी असे म्हटले आहे की 2030पर्यंत सर्व प्रौढ अल्कोहोल पितील आणि एकचतुर्थांश (23 टक्के) महिन्यातून किमान एकदा पितील. गुह्यांचा आलेख वाढविण्यामध्ये अमली पदार्थाचा मोठा हात आहे.