
रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-विसंग्राम आणि रयतक्रांती महायुतीचे उमेदवार आमदार उदय सामंत यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी मराठा मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला गायक अवधुत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी शिवसेना…शिवसेना हे गीत सादर करत महायुतीच्या कार्यकर्त्यांसह जनतेची मने जिंकंली. यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, रासपचे अशोक पवार, उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, संजय साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम,शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदिप साळवी, भाजप तालुकाध्यक्ष सुशांत चवंडे, माजी तालुकाध्यक्ष सतीश शेवडे, जि.प.अध्यक्षा स्वरुपा साळवी, जिल्हा महिला आघाडीच्या नेहा माने, वेदा फडके, कांचन नागवेकर, वर्षा पितळे, मनिषा बामणे,शहरप्रमुख बिपीन बंदरकर,सचिन करमरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांचा उमेदवारी अर्ज भरायला उपस्थित असलेली गर्दी पाहिल्यावर हा त्यांचा विजयी मेळावाच आहे, असे वाटते. महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येणार्या पहिल्या तीन मतदार संघात रत्नागिरीचा नंबर असेल,असे गौरवोदगार शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी काढले.
आमदार उदय सामंत यांनी आपल्या भाषणात आजच्या सभेला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी मी कधीही विसरणार नाही. तुमचे प्रेम असेच माझ्या पाठी राहो. आता मी महायुतीच्या सहा पक्षांचा उमेदवार आहे. भविष्यात सहाही पक्षांना सोबत घेऊन रत्नागिरी मतदार संघाचा विकास करू असे उदय सामंत यांनी सांगितले.





























































