
उत्तर गोव्यातील कांदोळी समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी परतीच्या पावसासोबत झालेल्या गडगडाटावेळी दिल्ली येथील दांम्पत्यावर वीज कोसळली. त्यात चैतन्य नागपाल (वय 35, दक्षिण-दिल्ली) यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी तरूणा नागपाल जखमी झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता ही घटना घडली. दुपारपासून परतीच्या पावसासोबत गडगडाट सुरू होता. यावेळी किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी लोकांना पाण्यातून बाहेर येण्यास सांगितले. त्यानंतर नागपाल दांपत्य किनाऱ्यावर बसले असता अचानक चैतन्य याच्या अंगावर वीज पडली. यात चैतन्याच्या अंगावरील कपडे जळाले. तसेच बाजूला बसलेल्या त्याच्या पत्नीला वीजेचा झटका लागल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली.
या घटनेनंतर जीवरक्षकांनी ताबडतोब चैतन्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश न आल्याने त्यांनी दोघांना ताबडतोब 108 रूग्णवाहिकेतून कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दखल केले. त्यानंतर चैतन्याला पुढील उपचारासाठी म्हापला येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती कळंगुट पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी दिली. नागपाल यांच्या कुटुंबातील सातजण बुधवारी गोव्यात आले होते. ते किनाऱ्याजवळील एका हॉटेलमध्ये उतरले होते. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी आमोणकर यांनी पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.




























































