पाईप चोरट्यांचा शोध घेताना पोलिसांना सापडला साडेसहा लाखांचा मुद्देमाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीतील मिऱ्याबंदर येथील भारती शिपयार्ड या कंपनीचे बंदीस्त गोदाम फोडून गोदामातील जहाज बांधणीसाठी लागणारे तांब्याचे पाईप व कारपेट असे एकूण 1 लाख 82 हजार 212 रुपयांचे साहित्य अज्ञात चोरटयांनी चोरून नेले होते. या चोरट्यांचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला भारती शिपयार्ड कंपनीतून चोरून नेलेला साडेसहा लाखांचा मुद्देमाल सापडला आहे.

या चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी एक पथक तयार करुन त्यांनी रत्नागिरी शहर व परिसरातील भंगार खरेदी करणाऱ्या व्यक्तींकडून या गुन्हयातील माल कोणी विक्रीकरीता आणला होता किंवा ते विक्रीसाठी संपर्क साधलेला होता का, याची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काम सुरू असताना रत्नागिरी शहर व परिसरात कोणतिही माहिती मिळाली नाही. चोरीचा माल कोल्हापूरला विक्रीसाठी नेल्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने माहिती घेण्यात येत होती. मिऱ्याबंदर येथे रहाणारे रुपेश कमलाकर सावंत व शिवराय गुड्डाप्पा कुंभार यांच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती पथकाल मिळाली. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देत माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांच्या माहितीत विसंगती आढळली. मात्र, खाक्या दाखवताच त्यांनी  गुन्ह्याची कबुली देत चोरलेल्या मालापैकी कारपेट कंपनीजवळ  असलेल्या एका चिरेबंदी पत्र्याचे खोलीमध्ये ठेवले असून तांब्याचे पाईप रत्नागिरी मजगाव रोड येथील भंगार व्यावसायिक प्रकाश विलास गोसावी याला विकल्याचे सांगितले. त्यानंतर भंगार व्यावसायिकाला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता चोरलेले पाईप कोल्हापूरात विकल्याचे सांगितले. कारपेट ठेवलेल्या खोलीची झडती घेतली असता त्या ठिकाणी कारपेटसह इलेक्ट्रीक कंट्रोल केबल, फायर सूट, कंट्रोज बॉक्स, हेड सेट असे जहाज बांधणीसाठी लागणारे 6 लाख 59 हजार 540 रुपये किंमतीचे साहित्य आढळले.  हे साहित्य भारती शिपयार्ड कंपनीच्या गोदामातून चोरल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूरला एक पथक पाठवून त्या ठिकाणी प्रकाश विलास गोसावी याने विकलेले पाईपचे 17,340 रुपये किंमतीचे तुकडे जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी  रुपेश कमलाकर सावंत (वय 39), शिवराय गुड्डाप्पा कुंभार, प्रकाश विलास गोसावी (वय 33) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 6,76,880/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही  कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक शिरीष सासने आणि त्यांच्या पथकाने केली.