
आरेतील 2 हजार 700 झाडे तोडण्याला स्थगिती देण्याबाबत दाखल केलेल्या चार याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्यानंतर रातोरात एमएमआरसीएल अर्थात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तब्बल 500 झाडांची कत्तल केली आणि मुंबईच्या फुप्फुसाचा अक्षरशः तुकडा तोडला. त्यामुळे वृक्षप्रेमींनी आरे कॉलनीत धाव घेऊन जोरदार आंदोलन केले, मात्र पोलिसांनी बेछूट लाठीमार करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर 38 वृक्षप्रेमींवर गुन्हे दाखल केले असून 29 जणांना अटक केली. तसेच 60 जणांची धरपकडही केली.
शनिवारी सकाळीही आंदोलनकर्त्यांनी आरेत जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु सकाळपासूनच या भागात 144 कलमांतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पश्चिम द्रुतगती मार्ग, मरोळ आणि पवईमार्गे आरेत जाणाऱया मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. त्यामुळे प्रवाशांचीही कोंडी झाली असून मुंबईकरांकडूनही प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलीस संरक्षणात शनिवारीही वृक्षतोड सुरूच होती. शिवसेनेने या वृक्षतोडीविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवारी चार याचिका फेटाळल्यानंतर एमएमआरसीएलच्या वृक्षतोडीवर स्थगिती आणण्यासाठी वृक्षप्रेमींनी नव्याने दाखल केलेला विनंती अर्जही हायकोर्टाने आज शनिवारी फेटाळून लावला. याप्रकरणी हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी आठवडाभराचा वेळ मिळावा यासाठी वृक्षतोडीला स्थगिती देण्याची विनंती अर्जाद्वारे करण्यात आली होती.
या कलमांतर्गत गुन्हे दाखल
332 कलमांतर्गत सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून रोखणे.
353 नुसार सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे.
144 नुसार जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करणे.
शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार
विकासाच्या नावाखाली जर पर्यावरणाचा ऱहास होत असेल तर शिवसेनेचा नेहमीच विरोध राहील असे सांगत मेट्रोच्या मनमानीविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. एमएमआरसीएलने रातोरात केलेली झाडांची कत्तल नियमबाह्य असल्याचे त्यांनी सांगितले. कांजूरमार्गसारखा पर्याय असताना आरेतच मेट्रो कारशेड उभारण्याचा अट्टहास का, असा सवालही त्यांनी केला.
दोन दिवसांत काय घडले
आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या ठिकाणी जंगल नसल्याचा हायकोर्टाचा निर्वाळा. त्यानंतर रातोरात मशीनच्या सहाय्याने 500 झाडांची कत्तल.
याबाबत कळताच आरेमध्ये वृक्षप्रेमी जमण्यास सुरुवात.
एमएमआरसीएलविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पोलिसांकडून लाठीचार्ज. एकूण 60 जण ताब्यात.
सर्वांना वनराई आणि दहिसर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथून काहीजणांना सोडून देण्यात आले.
त्यानंतर पोलिसांनी आज शनिवारी सकाळी 29 जणांना अटक केली, 38 जणांवर गुन्हे दाखल केले तर 60 जणांना ताब्यात घेतले.
बॉलीवूडकरांकडूनही वृक्षतोडीचा निषेध
बॉलीवूडकरांकडूनही आरेतील वृक्षतोडीचा निषेध नोंदवण्यात आला. फरहान अख्तर, दिया मिर्झा, स्वरा भास्कर यांनी मेट्रोच्या मनमानीविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली. या सेलिब्रिटींनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. आरे हे मुंबईचे हिरवे सोने असून एमएमआरसीएलने मनमानीपणे येथील वृक्षतोड करणे चुकीचे असल्याचे फरहानने म्हटले आहे, तर दिया मिर्झाने हे झाडांचे हत्याकांड असून ते ताबडतोब थांबवले पाहिजे असे म्हटले आहे. हवामानात वेगाने बदल होत असून मुंबईकर मुलांच्या भविष्यासाठी, निसर्गाच्या प्रेमाखातर एकत्र आले आहेत. हा मोठा बदल असल्याचे दिया मिर्झाने म्हटले आहे तर स्वरा भास्कर, रिचा चड्डा, उर्मिला मातोंडकर, पूजा भट्ट यांनीही एमएमआरसीएलच्या कृत्याचा निषेध केला आहे.
दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचा दावा
आंदोलनानंतर पोलिसांनी एकूण 60 जणांना ताब्यात घेतले. त्यात काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे तर एकूण 38 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात सहा महिलांचा समावेश आहे. दरम्यान, मोठय़ा संख्येने जमाव जमला आणि त्यांनी उग्र आंदोलन केले. जमावाला पांगवताना दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचा दावा एका 28 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलने केला. या दाव्यानुसारच पोलिसांनी 38 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
शिवसेनेच्या रणरागिणींचे आंदोलन
विकासाच्या नावाखाली होणाऱया झाडांच्या कत्तलीला शिवसेनेने जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे ‘मेट्रो’ कारशेडसाठी झाडांची कत्तल सुरू होत असल्याची माहिती मिळताच शिवसेनेच्या रणरागिणींनी ‘आरे’त धाव घेतली. यावेळी ‘आरे’चे जंगल वाचलेच पाहिजे’, ‘आरे वाचवा, मुंबई वाचवा’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी ‘आरे’ परिसरात ‘जमावबंदी’ असल्याचे सांगत नगरसेविका-विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, माजी महापौर शुभा राऊळ, सिनेट सदस्या शीतल शेठ-देवरुखकर, संजना घाडी, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांना ताब्यात घेऊन वनराई पोलीस ठाण्यात नेले. ‘मेट्रो’ कारशेडच्या नावाखाली सुरू असलेल्या झाडांच्या कत्तलीचा शिवसेनेने जोरदार निषेध केला.
























































