
2016 मध्ये नजरचुकीने पाकिस्तानात गेलेला हिंदुस्थानी लष्कराचा जवान चंदू चव्हाण याने लष्कराच्या छळणुकीला कंटाळून राजीनामा दिल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या तावडीतून आपण सुखरूप हिंदुस्थानात आलो परंतु इथे आल्यानंतर आपल्याकडे नेहमीच संशयाने पाहिले गेले. जवानांनी आपला अक्षरशः छळ मांडला. शेवटी मीच कंटाळून राजीनामा दिल्याचे चंदू चव्हाणने म्हटले आहे. चव्हाणने आपला राजीनामा नगरस्थित सैन्याच्या तुकडीच्या कमांडरकडे पाठवल्याचे सांगितले.
सर्जिकल स्ट्राईकदरम्यान चंदू चव्हाण नजरचुकीने पाकिस्तानात गेला होता. पाकिस्तानी लष्कराच्या तावडीत सापडल्यानंतर त्याच्यावर प्रचंड अत्याचार करण्यात आले. मरणासन्न अवस्थेत पाकिस्तानने त्याला हिंदुस्थानच्या ताब्यात दिले होते. दरम्यान, गेल्याच महिन्यात त्याचा मोटारसायकल अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हेल्मेट न घातल्याने त्याला अनेक ठिकाणी प्रचंड मार लागला.

























































