कराड दक्षिणमध्ये 13 उमेदवार रिंगणात; तिरंगी लढतीची चुरस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकीतील अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कराड दक्षिणचे चित्र स्पष्ट झाले असून 19 पैकी 6 जणांनी अर्ज मागे घेतला असून 13 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत तिरंगी होणार आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडखोरी झाली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात माजी मंत्री विलासकाका पाटील यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील निवडणूक रिरंणात उतरले असले तरी भाजपाच्यावतीने डॉ. अतुल भोसले यांनी जोरदार तयारी केली आहे. उदयसिंह पाटील अपक्ष म्हणून निवडणुकीस सामोरे जात आहेत. पृथ्वीराज चव्हाण, डॉ. अतुल भोसले, उदयसिंह पाटील या तिघांमध्ये तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 6 उमेदवारांनी माघार घेतल्याने 13 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीला नाराजीचा फटका बसला आहे. कराडचे माजी नगरसेवक आनंदराव लादे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून बाळकृष्ण देसाई वंचित आघाडीचे उमेदवार आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीशी काडीमोड घेतल्यानंतर कराडचे माजी नगराध्यक्ष तथा एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार हेही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील डॉ. अतुल भोसले (भाजप), आनंदा थोरवडे (बसपा), पृथ्वीराज चव्हाण ( काँग्रेस पक्ष), पंजाबराव पाटील (बळीराजा शेतकरी संघटना – अपक्ष), बाळकृष्ण देसाई (वंचित बहुजन आघाडी), अल्ताफ शिकलगार (एमआयएम), अमोल साठे (अपक्ष), आनंदा लादे (अपक्ष), अॅड. उदयसिंह पाटील (अपक्ष), सदाशिव रसाळ (अपक्ष), लतीफा मुजावर (अपक्ष), विश्वजित पाटील (अपक्ष), वैष्णवी भोसले (अपक्ष) असे एकूण 13 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. डॉ. सुरेश भोसले (अपक्ष), नितीन लोंढे (अपक्ष), गोरख शिंदे (अपक्ष), सतीशकुमार यादव (अपक्ष), संतोष थोरवडे (अपक्ष), कृष्णात पवार (अपक्ष) या 6 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.