‘आरे’तील जमावबंदी हटवली! नागरिकांची ये-जा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ‘आरे’तील वृक्षतोडीला 21 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिल्यामुळे गोरेगाव ‘आरे’ परिसरातील आंदोलनही थांबले आहे. त्यामुळे या ठिकाणी लागू करण्यात आलेली ‘जमावबंदी’ हटवण्यात आली असून आरे परिसरातून ये-जा सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

‘आरे’त होणार्‍या मेट्रो रेल कारशेडसाठी तोडण्यात येणार्‍या 2185 झाडांच्या कत्तलीला जोरदार विरोध सुरू आहे. न्यायालयाने ‘आरे’तील वृक्षतोडीला विरोध करणार्‍या सर्व याचिका फेटाळल्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने त्याच दिवशी रातोरात शेकडो झाडे तोडण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर ही माहिती व्हायरल होताच शेकडो मुंबईकर-वृक्षप्रेमींनी झाडे तोडण्यास जोरदार विरोध करीत ‘आरे’ परिसरात सुरू केलेले आंदोलन उग्र झाल्याने पोलिसांनी लाठीचार्जही केला. परिस्थिती आणखी भडकू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदीही लागू केली. ‘आरे’तून जाणारा मार्गही बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ‘आरे’ परिसरात परिस्थिती सुरळीत झाल्याने 144 कलम हटवण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिली. दरम्यान, ‘आरे’ परिसरातील जनजीवन सुरळीत सुरू असले तरी या ठिकाणी अजूनही मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे स्थानिक रहिवासी श्याम भोईर यांनी सांगितले.