
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला शुक्रवारी पेण येथे अपघात झाला असता. प्रचार सभेसाठी त्यांचे हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील ओल्या मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले मात्र प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा नियंत्रण प्राप्त केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे पीए, एक इंजिनिइर, एक पायलट आणि को-पायलट हे पाचजण बसले होते.
हेलिगो चार्टर प्रा.लि. कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. नगर जिल्ह्यातील कर्जत येथून सभा संपवल्यावर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी आले असताना पाऊस पडल्याने धावपट्टी ओली झाली होती व त्यावर चिखल झाला होता. साडेचारच्या सुमारास पेण-बोरगाव येथे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. तेव्हा खाली चिखल असल्याने हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतली व त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले मात्र त्यांनी तत्काळ प्रसंगवधान दाखवत त्यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर मुख्यमंत्री सुखरुपपणे खाली उतरले आणि पेण येथील भाजपचे उमेदवार रविंद्र पाटील यांच्या प्रचारसभेसाठी आले. यापूर्वीही मुख्यमंत्री अलिबाग येथे आले असतान सुद्धा अशाच प्रकारे हॅलिकॉप्टरचा अपघात झाला होता.
दरम्यान, या आधीही मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातून ते बालंबाल बचावले होते. आता पुन्हा असाच अपघात होताना ते बचावले आहेत. हेलिकॉप्टर लॅण्ड होताना असे प्रकार होतात. त्यामुळे अपघात झालेला नाही. मुख्यमंत्री सुरक्षित खाली उतरले आणि पुन्हा काम संपवून परतले आहेत, असे जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

























































