
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराचा झंझावात शुक्रवारी अमरावती आणि पुणे जिह्यात उसळला. ‘आम्ही बंद हॉलमधली माणसे नाहीत. उघडय़ा मैदानात लढणारी माणसे आहोत. बोलतो… पाहतो… करतो… असे बोलणारी शिवसेना नाही. जे बोलतो तेच करतो. विजय आपलाच आहे. मॅच जिंकणारच!’ असा ठाम आत्मविश्वास व्यक्त करतानाच उद्धव ठाकरे यांनी ‘पण गाफील राहू नका’ असा कानमंत्रही दिला.
अमरावतीसह पुण्याच्या नारायणगाव, राजगुरूनगर, पिंपरी येथे शिवसेना-भाजपा-रिपाई महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा झाल्या. त्या सभांना प्रचंड गर्दी जमली होती. अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार प्रीती बंड यांच्या प्रचारासाठी दसरा मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाली. निष्ठा आणि नैतिकतेशी सोयरसूतक नसणाऱया लाचारांनी सध्या राजकारणात उच्छाद मांडला असून त्या लाचारीविरुद्ध ‘बंड’ म्हणजे शिवसेनेची उमेदवारी आहे असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. अशा लाचारांना ‘फेव्हिकॉल’ लावून एकाच ठिकाणी कायमचे बसवा असे आवाहन त्यांनी करताच टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला.
पैशाच्या जोरावर कुणालाही विकत घेण्याची मिजासखोर भाषा करणाऱ्या आघाडीच्या उमेदवाराची उद्धव ठाकरे यांनी यावेळी पिसे काढली. शिकसेना आणि तिचे माकळे ही काही किकाकू जमात नसल्याचे ठणकावतानाच धनशक्तीच्या बळाकर अशी मिजासखोरी दाखकिणाऱया लाचारांनी उगाच शिकसेनेशी काकडय़ात जाकू नये, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. संपूर्ण देशामध्ये भगवा असताना अमरावतीमध्ये भगवा नाही याबद्दल खंत व्यक्त करतानाच उद्धव ठाकरे यांनी अमराकती जिल्ह्यातील महायुतीच्या आठही उमेदकारांना किजयी करा असे आकाहनही यावेळी केले. शेती जगण्यासाठी किशेष अनुदान देऊन मागेल त्याच्या शेतीला कुंपण टाकून देऊ तसेच कापूस, सोयाबीन, तूर या पिकांसाठी धोरण ठरकू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
बैलगाडा शर्यतीच्या आड येणारी भूते गाढून टाका
जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार शरद सोनवणे यांच्या प्रचारासाठी नारायणगावच्या मुक्ताबाई यात्रा मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा झाली. ‘सकाळपर्यंत जुन्नरमध्ये पाऊस होता. आपल्यावर छत्रपतींचे आशीर्वाद असल्याने पावसाने विश्रांती घेतली. परंतु येत्या 21 तारखेला धनुष्यबाणाचे बटण दाबून जुन्नरमध्ये मतांचा भगवा पाऊस पाडा’ अशी साद उद्धव ठाकरे यांनी घालताच टाळ्यांच्या कडकडाटाने परिसर दुमदुमला. बैलगाडा शर्यतीच्या आड येणारी भुते आपल्याला अगोदर गाडायची आहेत असा टोला त्यांनी या शर्यतीबद्दल लोकांची दिशाभूल करणाऱया काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला लगावला.
गायब अजित पवारांना धरणाच्या काठावर शोधले
उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर खरपूस टिका केली, ईडीने न बोलावताच शरद पवार ईडी कार्यालयाकडे निघाले. पण अनाहूत पाहुण्यासारखे निघालेल्या पवारांना ईडीने बजावले. जेव्हा बोलावणे येईल तेव्हा या मग बघा सोडतो का? दुसरे ते अजित पवार ईडीची चौकशी सुरू काय झाली हे गायबच झाले. राष्ट्रवादीवाले त्यांना धरणाच्या काठावर कोठे सापडतात का शोधत बसले, असे म्हणताच एकच हशा उसळला.
आदिवासी आरक्षणाला कणभरही धक्का लागू देणार नाही!
आता मराठय़ांना आरक्षण मिळणार आहे. धनगर समाजही आरक्षण मागतोय असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, आदिवासी बांधवांना मी एक सांगतो, तुमचे आदिवासींचे हक्काचे आरक्षण कणभर देखील कमी न करता धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ. आरक्षणाच्या प्रश्नावरून गोंधळ घालण्याचे काम आघाडीचे लोक करतात. माझ्या सभेच्या व्यासपीठावर सर्व समाजाचे प्रतिनिधी उपस्थित असतात. जे हक्काचे आहे ते मिळालेच पाहिजे. ही आमची परखड भूमिका आहे.
पवार कसले लढले… ते तर फसले
शरद पवार यांचाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी समाचार घेतला. ‘पवार म्हणतात मी ईडीबरोबर लढलो. अरे ईडीने न बोलावताच अनाहुतासारखे तुम्ही गेला आणि कसले लढले. पवार तर फसले. ईडीने बोलावल्यावर जा, मग बघा. सोडणार नाहीत.’ असे उद्धव ठाकरे म्हणताच एकच हशा पिकला. दहा रुपयात जेवणाची थाळी देण्याच्या शिवसेनेच्या वचनावर टीका करणाऱया अजीत पवारांचीही ‘अरे तुझ्याकडे लोकं पाणी मागायले आले तेव्हा त्यांना तू काय दिलं?’ अशी खिल्ली उडवली.
राजगुरुनगर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खणखणीत सभा झाली. पैशाच्या जोरावर कुणालाही विकत घेण्याची मिजासखोर भाषा करणाऱ्या आघाडीच्या उमेदवाराने लक्षात ठेवावे, शिवसेना आणि तिचे मावळे ही काही विकाऊ जमात नाही. धनशक्तीच्या बळावर अशी मिजासखोरी दाखविणाऱया लाचारांनी उगाच शिवसेनेशी वाकड्यात जाऊ नये.
शिवनेरीच्या मूठभर मातीने रामजन्मभूमीला वेग आला
पुणे ही शिवछत्रपतींची भूमी आहे. गेल्या वर्षी मी शिवनेरीवर आलो होतो तेव्हा गडावरील मूठभर माती घेऊन अयोध्येला गेलो. त्यानंतर रामजन्मभूमीच्या कामाला वेग आला. कदाचित महिनाभरात निर्णय येईल. या शिवनेरीच्या मातीत चमत्काराची ताकद आहे. जेव्हा हा देश हिरवा होईल की काय अशी भीती होती तेव्हा आपल्या सगळ्यांचे दैवत छत्रपती शिवराय शिवनेरीवर जन्माला आले आणि इतिहास घडला. शिवरायांच्या या भूमीवरच विजय साजरा करण्यासाठी मी वाजतगाजत शिवनेरीवर येईन अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.


























































