
अक्कलकुवा, धुळे, दिंडोरी, नांदगाव, येवल्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांमुळे शनिवारी भगवे वादळच निर्माण झाले होते. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. ‘निकालाआधीच काँग्रेस भुईसपाट झाली आहे. राष्ट्रवादी तर जमिनीखाली काहीतरी शोधतेय. शरद पवार या वयातही फिरताहेत’, असा टोला लगावतानाच अटलजी यांचे सरकार एका मताने पाडणार्या पवारांनी आता आमच्या नादी लागू नये, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. युती करण्याचं जसं आमचं ठरलं होतं तसंच महायुतीचं सरकार आणण्याचं यावेळी जनतेने ठरवल्याने महायुती प्रचंड मताधिक्याने पुन्हा सत्तेवर येणारच, असा जबरदस्त आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे दिंडोरी-पेठ मतदारसंघातील उमेदवार भास्कर गावीत, कळवण-सुरगाणा मतदारसंघातील उमेदवार मोहन गांगुर्डे यांच्या प्रचारार्थ वणी येथील बाजार पटांगणात, नांदगाव मतदारसंघातील उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचारार्थ मनमाड येथील महर्षी वाल्मीकी स्टेडियमवर तर येवला मतदारसंघातील उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ मनमाड रोडवरील यश लॉन्स येथे उद्धव ठाकरे यांच्या अभूतपूर्व सभा झाल्या. शिवसेनेचा उमेदवार असेल तिथे धनुष्यबाण आणि भाजपाचा उमेदवार असेल तिथे कमळाला मतदान करून भगव्याचे शिलेदार विधान भवनात पाठवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी या सभांमध्ये करताच महायुतीचा विजय असो…‘जय भवानी…जय शिवाजी अशा जयघोषाने परिसर दुमदुमला.
शिवसेनेने सत्तेत असूनही जनतेच्या न्याय्य-हक्कांसाठी संघर्ष केला असे सांगून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शेतकर्यांना पीकविम्याचे पैसे मिळावेत यासाठी पीकविमा कंपन्यांच्या मुंबईतील कार्यालयावर शिवसेनेने मोर्चा काढल्यानंतर राज्यभरातील दहा लाख शेतकर्यांना पीकविम्याचे अकराशे कोटी रुपये मिळाले. सरकारच्या चांगल्या कामात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे असे अभिमानाने सांगतानाच, शिवसेनेने आंदोलने केली, सरकारला जाब विचारला; परंतु पाच वर्षात सरकार कधीही अस्थिर होवू दिले नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. रस्ते, पाणी, शेती यासह या भागातील जे-जे प्रश्न असतील ते सर्व सोडविले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
दिंडोरीतील वणी येथे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, फार वर्षांनी मी येथे आलोय. हा प्रचंड जनसमुदाय पाहता या दोन्हीही मतदारसंघातील उमेदवार प्रचंड मताधिक्यांनी विजयी होतील हा विश्वास आहे. भगवा खाली पडू देणार नाही, ही परंपरा येथेही राहील, असे ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार भारती पवार, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, आमदार नरेंद्र दराडे व किशोर दराडे, विनायक पांडे, माजी आमदार रामदास चारोस्कर आणि धनराज महाले आदी उपस्थित होते.
आदिवासींना न्याय देणारच
शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले तर आदिवासींच्या हक्कावर गदा येईल, अशी आग विरोधकांकडून लावली जात आहे; परंतु असे कदापिही होणार नाही. आदिवासींचे सर्व प्रश्न सोडविले जातील, त्यांच्या न्याय-हक्काला धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी देताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
‘ती’ चूक छगन भुजबळांची होती हे अजित पवारांनी सांगावे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणे ही राष्ट्रवादीची चूक होती, असे म्हणणार्या अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर ती चूक छगन भुजबळांची होती असे त्यांनी त्यांचे नाव घेऊन सांगावे, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येवला येथे केले. येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. शिवसेनाप्रमुखांना अटक करणे ही राष्ट्रवादीची चूक होती, या अजित पवारांच्या वक्तव्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर ती चूक छगन भुजबळांची होती, असे नाव घेवून सांगावे. विभागाचे प्रमुखांची ती चूक होती, असे ते सांगत असले तरी पक्षाचे प्रमुख शरद पवार हे त्यावेळी ती चूक करणार्यांचे बाप होते, हे विसरता येणार नाही. शरद पवारांनी गद्दाराला शिवसेनाप्रमुखांविरुद्ध उभे केले होते, आता त्याच गद्दाराला या निवडणुकीत गाडण्यासाठी शिवसेनेने संभाजी पवार या कट्टर शिवसैनिकाला येवल्यातून उभे केले आहे. भुजबळांचा होणारा पराभव हा त्यांच्या कर्माचे फळ असेल, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी सूडाने कारवाई करणार्यांच्या पार्श्वभागावर लाथ घातली असती. शिवशाहीचे सरकार आल्यानंतर कोणाशीही सूडाने वागू नका, जनतेची कामे करा, सुख-समाधान द्या, न्याय्य-हक्कासाठी आंदोलन करणार्यांवर लाठय़ा चालवू नका, असे शिवसेनाप्रमुखांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना निक्षून सांगितले होते, याचीही आठवण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करून दिली. तुम्ही आमच्याशी कितीही सूडाने वागले असाल पण, आम्ही सूडाने, अन्यायाने वागणार नाही, असे शपथपूर्वक सांगतो, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

























































