दिल्ली डायरी – ‘दीदी के बोलो’ जोरात, पण बंगाल शांत का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी ([email protected])

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात डरकाळी फोडण्याची एकही संधी न दवडणाऱया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ‘ममता बॅनर्जी सध्या ‘गप्प’ का आहेत, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठेवून संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी ‘दीदी के बोलो’ हे अभियान तृणमूलतर्फे जोरात सुरू आहे. मात्र ज्या दीदींसाठी हे अभियान आहे त्याच नेमक्या ‘मौना’त आहेत. ममतादीदींच्या पक्षावरही शारदा चिटफंड घोटाळ्यामुळे ‘ईडी’ नावाच्या ‘ग्रहा’ची वक्रदृष्टी झाल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत ‘चिदंबरम’ अनुभव लक्षात घेऊन थेट दिल्लीश्वरांशी पंगा घेण्याऐवजी ममतादीदींनी ‘आस्ते कदम’ टाकायचे ठरवलेले असावे.

‘पोंझी’ घोटाळ्याची म्हणजेच शारदा चिटफंड घोटाळय़ाची चौकशी थंडावण्यासाठीच ममतादीदींनी भाजपशी छुपे संधान साधल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते आणि ममतांचे राजकीय हाडवैरी अधीररंजन चौधरी यांनी केला आहे. गमतीचा भाग म्हणजे बंगालातली शांतता दोन्ही बाजूंनी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा मुर्शिदाबादमध्ये दिवसाढवळ्या खून होऊनही बंगाल भाजपने त्याचा निषेधही केला नाही किंवा राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही. या उभयपक्षी शांततेत काय राजकीय अर्थ दडले आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. अधीररंजन चौधरींनीच संघ स्वयंसेवकाच्या हत्येवरून ममतांवर निशाणा साधत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. कारण काहीही असो, ममतादीदी गप्प आहेत हे कल्पनेपलीकडचे आहे हेच खरे. दीदींना मौनातून ‘बाहेर’ पडायला आणि भाजपला ऑक्टिव्ह व्हायला किती काळ लागतो ते दिसेलच!

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी-शहा हटाओसाठी ममतादीदींनी मोठा पुढाकार घेतला होता. इतकेच नव्हे तर समविचारी पुरोगामी मंडळींची जुळवाजुळव महागठबंधनच्या नावाखाली करण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता. भाजपाध्यक्ष अमित शहांना कोलकात्यामध्ये सभा घेण्यास मज्जाव करेपर्यंत ममता बॅनर्जींनी मजल मारली होती, मात्र लोकसभेच्या निकालानंतर विरोधकांची अवस्था गलितगात्र झाली आहे. काँग्रेसची अवस्था निर्नायकी असल्याने बाकी विरोधकांनी अळीमिळी गुपचिळी धरली आहे. चिदंबरम यांची तिहारमधील अवस्था लक्षात घेऊन विरोधक ‘नको रे बाबा ईडीची पीडा’ असे म्हणत जीव मुठीत धरून राजकीय जीवन कंठत आहेत. शारदा चिटफंडचे प्रकरण तृणमूलच्या मानेवरची टांगती तलवार आहे. शारदा चिटफंड घोटाळ्यामुळे अगोदरच ममतादीदींचे अर्धेअधिक मंत्री आणि सात-आठ खासदार कोणत्याही क्षणी गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार हे कोणत्याही क्षणी ‘आत’ जातील अशी स्थिती आहे. अशा वेळी ममतादीदींनी एकप्रकारे ‘युद्ध(स्वल्प)विराम’ची घोषणा केलेली दिसते. चिटफंड प्रकरणात तृणमूलचा पाय खोलात जाण्याचीच शक्यता जास्त आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत भाजपने तृणमूलला जबरदस्त फटका दिला. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे ममतादीदींनी अनावश्यक प्रमाणात मुस्लिमांचे केलेले लांगूलचालन होते. दुर्गोत्सवाला उत्सवाला पायबंद घालण्यापासून जय श्रीरामचा नारा देण्यास विरोध दर्शविण्यापर्यंत मुस्लिम अनुनयांच्या दाढय़ा कुरवाळण्याचे राजकारण ममतादीदींनी केले. ते त्यांच्यावर चांगलेच उलटले. ममतांच्या बंगालात आपले काही खरे नाही अशी भावना हिंदूधर्मीयांत निर्माण करण्यात भाजप यशस्वी झाला आणि गरीब व मध्यमवर्गीय हिंदू मोठय़ा प्रमाणात तृणमूलपासून भाजपकडे शिफ्ट झाला. तोही तृणमूलच्या दृष्टीने चिंता आणि चिंतनाचा विषय आहे. हिंदूंनी पाठ फिरवली तर आपली धडगत नाही हे लक्षात आल्यानंतर आता ‘जय श्रीराम’ घोषणेला विरोध करणाऱया ममतादीदी भगवान जगन्नाथ यात्रेचे प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित खासदार नुसरत जहांसोबत मिरवून घेत आहेत. भाजपच्या आक्रमक राजकारणाला उत्तर देण्यासाठी ममतादीदींनी ‘सॉफ्ट हिंदुत्वा’ची ढाल पुढे केली आहे. याचा त्यांना किती राजकीय लाभ होतो ते भविष्यात समजलेच, पण तूर्त तरी ममता बॅनर्जींच्या जोडीला बंगाल भाजपही शांत का आहे आणि हा ‘शांततापूर्ण सौहार्द’ कशामुळे आहे हे गूढ निर्माण झाले आहे.

सोनाली फोगाटांची ‘देशभक्ती…’

sonali-phogat

मध्यंतरी भाजप नेतृत्वाने उमेदवारांचे फेसबुक फॉलोअर किती, त्यांची सोशल मीडियात भक्त किती यावर उमेदवारी द्यायची की नाही असाही एक निकष आणला होता. त्या निकषात सोनाली फोगाट तंतोतंत उतरणाऱया ठरल्या आहेत. सोनाली या टिकटॉकवर कमालीच्या लोकप्रिय आहेत. त्यांच्या या लोकप्रियतेचा लाभ उठविण्यासाठी महिला सबलीकरणाचा नारा देत भाजपने त्यांना माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा मतदारसंघ असलेल्या हरयाणातील आदमपूर येथून भजनलालांचे चिरंजीव कुलदीप बिष्णोई यांच्या विरोधात मैदानात उतरवले आहे. हरयाणात भाजपकडे खट्टर सरकारची कामगिरी सांगावी अशी नाही. त्यामुळे हरयाणातील निवडणूक देशभक्तीच्या लाटेवरच कशी फिरेल याची तजवीज सत्ताधाऱयांनी केलेली आहे. एका सभेत देशभक्तीने ओतप्रोत झालेल्या या प्रखर देशाभिमानी सोनाली फोगाटांनी भारतमाता की जय अशा घोषणा दिल्या. मात्र सभेतून थंड प्रतिसाद मिळाल्यामुळे नाराज झालेल्या सोनाली यांनी उपस्थितींना ‘आप क्या पाकिस्तान से आये हो क्या’ असा सवाल विचारला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाल्याने अखेर फोगाट यांना माफी मागावी लागली. फोगाट यांची तथाकथित देशभक्ती भाजपाला कितपत तारते ते यथावकाश कळेलच.

नशीबवान सब्जीवाला; कमनशिबी महिला नेत्या

juily-gumnami

राजकारण हे फक्त धनाढय़ांचेच क्षेत्र आहे असा समज समाजात दृढ होत असतानाच उत्तर प्रदेशातील घोसी येथील पोटनिवडणुकीत भाजपने रस्त्यावर भाजी विकणाऱया विजय राजभर यांना उमेदवारी देऊन एक चांगला पायंडा पाडला आहे. घोसीचे आमदार फागू चौहान यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर तिथे निवडणूक होत आहे. भाजपमध्ये तसेही पंतप्रधान मोदींचीच ‘इमेज’ ही चायवाला अशी आहे. आता चायवाल्यानंतर उत्तर प्रदेशात एका ‘सब्जीवाल्या’चा उदय झाला आहे. विजय राजभर यांचे वडील नंदलाल हे मऊ येथील मुन्शीपुरा परिसरात फुटपाथवर भाजी विकतात. विजय त्यांना अधूनमधून मदत करत असतात. त्यामुळे आपसूकच विजय यांच्याबद्दल मततदारसंघात सहानुभूती आहे हे वेगळे सांगायला नको. एकीकडे विजय यांची राजकारणातील ही कहाणी प्रेरणादायी असताना दुसरीकडे राजकारणातले पद म्हणजे कसे ‘अळवावरचे पाणी’ असते याचा दुर्दैवी अनुभव मध्य प्रदेशातील शिवपुरीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जुईली गुमनामी घेत आहेत. एकेकाळी राज्यमंत्रीपदाच्या दर्जाचे पद उपभोगलेल्या जुईली सध्या दोन वेळच्या अन्नाला आणि पुरेशा निवाऱयाला महाग झाल्या आहेत. शिवपुरीतील लोहारपुरा या आपल्या गावी सध्या शेळीपालन करून त्या आपला उदरनिर्वाह कसाबसा करत आहेत. सरकारदरबारी ‘इंदिरा आवास योजने’अंतर्गत आपण घरासाठी अर्ज केला होता, मात्र अजूनही आपल्याला घर मिळालेले नाही अशी खंत त्या व्यक्त करतात. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक गरीबाला हक्काचे घर देण्याचे आश्वासन दिले आहे. गुमनामी कोणत्या पक्षाच्या हे पाहण्याऐवजी माणुसकीच्या नात्याने आयुष्याच्या संध्याकाळी कधीकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेल्या या महिलेला काँग्रेस व भाजपने मदत करायलाच हवी.