एमएमआरडीएला दिलासा नाहीच; मेट्रो-4 प्रकल्पासाठी वृक्षतोडीस हायकोर्टाची स्थगिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कासार वडवली ते वडाळा या प्रस्तावित मेट्रो-4 प्रकल्पासाठी झाडे तोडण्याचा निर्णय घेणाऱया मेट्रो प्रशासनाला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांच्या खंडपीठाने या प्रकल्पासाठी एकही झाड तोडू नये असे स्पष्ट करत वृक्षतोडीवर तात्पुरती स्थगिती घातली. दरम्यान, न्यायालयाच्या या स्थगितीमुळे मेट्रो-4 चे काम रखडण्याची चिन्हे आहेत.

ठाणे-मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एमएमआरडीएमार्फत कासार वडवली (ठाणे) ते वडाळा मेट्रो- 4 प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी या मार्गात अडथळा निर्माण करणाऱया हजारहून अधिक झाडांच्या कत्तलीचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. मेट्रो प्रशासनाच्या या वृक्षतोडीला मात्र ठाणे नागरी प्रतिष्ठान व रोहित जोशी यांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच या मेट्रोचे काम भुयारी करण्यात यावे अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

सुनावणीवेळी एमएमआरडीएने आपली बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, सदर झाडे ही रस्त्याच्या मध्ये असल्याने ती कापल्यास पर्यावरणास धोका पोहोचणार नाही. त्याला याचिकाकर्त्यांनी जोरदार विरोध करत वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार असल्याचे खंडपीठाला सांगितले. खंडपीठाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेत मेट्रो प्रशासनाला पुढील आदेश मिळेपर्यंत एकही वृक्ष तोडू नये असे बजावले व सुनावणी तहकूब केली.