
किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता तालुक्यात शांततेत मतदान झाले. सकाळी पाऊस थांबल्याने मतदारांनी उत्साहात मतदान केले. मात्र, तालुक्याच्या पूर्व भागात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तर इतरत्र पाच वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्यावर मतदानाचा वेग मंदावला. मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 38 टक्के,तीन वाजेपर्यंत 48 टक्के तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 58 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात विविध मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिनच्या संथ गतीमुळे दिवसभर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदान सुरूच होते. मतदारसंघात सरासरी 72 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मतदारसंघातील तीन मतदान केंद्रांवर मतदानयंत्र बंद पडण्याचे प्रकार घडले. तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथील मतदान केंद्रांवर दुपारी दोन वाजता मतदानयंत्र बंद पडले, तर मुंगशी येथील व नगर तालुक्यातील इसळक येथील मतदान केंद्रावर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मतदानयंत्रात बिघाड झाल्याने तीनही ठिकाणी तब्बल दोन तास मतदान प्रक्रिया बंद पडली होती. मात्र, प्रशासनाने दुसरी यंत्रे उपलब्ध करुन दिल्यानंतर सुरूळीतपणे मतदान पार पडले. नांदूरपठार, आरणगांव, रायतळे, खडकवाडी,यादवाडी येथील ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना घडल्या. तालुक्यातील राळेगणसिध्दी येथील दोनही मतदान केंद्रांवर अधिकारी व कर्मचार्यांच्या गलथानपणामुळे दिवसभर मतदान प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू होती.त्यामुळे मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या.मतदानास विलंब होत असल्याने मतदार त्रस्थ झाल्याचे चित्र राळेगणसिध्दी येथील दोनही मतदान केंद्रांवर पहावयास मिळाले. अनेक मतदानकेंद्रांवर प्रत्येक मतदाराची मतदान प्रक्रीया पूर्ण होण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे मतदानकेंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
तालुक्यातील पुणेवाडी येथील मतदानकेंद्रावर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधे किरकोळ बाचाबाची झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद मिटला. मात्र, दिवसभर कुरबुरी सुरू होत्या. बाचाबाचीच्या प्रकारानंतर पुणेवाडी येथील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिध्दी येथील मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी मतदानानंतर राळेगणसिध्दी येथील मतदान केंद्राच्या आवारात उभारलेल्या ’सेल्फी पॉईंट’ची कुतूहलाने चौकशी केली. शिवसेनेचे उमेदवार आमदार विजय औटी व त्यांच्या पत्नी,पारनेर पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री औटी यांनी पारनेर येथील सेनापती बापट विद्यालयातील मतदानकेंद्रावर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके व त्यांच्या पत्नी,जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांनी हंगे येथे मतदानाचा हक्क बजावला.बहिरोबावाडी (किन्ही) येथील तान्हाबाई मानपा मोढवे या 104 वर्षाच्या वृध्देने आपल्या पणतूच्या सहाय्याने मतदानाचा हक्क बजावला.



























































