
मालवण शहर धुरीवाडा मार्गावरील कोळंबखाडी क्षेत्रातील कांदळवन भागातील अनेक झाडे सुकून गेली आहेत. अनेक झाडांची सर्व पाने सुकून गेली आहेत. किनारा तसेच खाडीच्या मधोमध असलेली झाडेही सुकून गेली असून झाडे मृत झाल्याची भीती वृक्षप्रेमी व्यक्त करत आहे. गेली अनेक वर्षे परिसराचे नैसर्गिक सौंदर्य वाढवणारी आणि नैसर्गिक साधनसामग्री असलेली ही झाडे कशामुळे सुकून गेली, याबाबत वन विभाग, कांदळवन विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी वृक्ष प्रेमींकडून केली जात आहे.
मालवण आचरा मार्गावर कोळंब खाडी पात्रात कांदळवन क्षेत्र आहे. यात विविध प्रकारची कांदळवन व कांदळवनसदृश झाडे आहेत. पक्षांचा विविध प्रकारचा अधिवासही या ठिकाणी आहे. येथील परिसराची ओळख असलेली झाडे गेल्या काही दिवसांपासून सुकून गेल्याचे चित्र आहे. अचानक असे झाले तरी काय, असा सवाल वृक्षप्रेमींना पडला आहे. या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात सुकलेली झाडे दिसून येत आहेत. त्यामुळे झाडे मृत झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कांदळवन विभागाच्या मालवण येथील अधिकाऱ्यांनी सुकलेल्या झाडांबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयाला दिली आहे. त्यानुसार तज्ज्ञ पथकाकडून कोळंब खाडी क्षेत्रातील झाडांची पाहणी होणार आहे, अशी माहिती मालवण येथील अधिकाऱ्यांनी दिली.
































































