सोनसोडा प्रकल्पावर उपाय काढून कचरा प्रश्न सोडवणार : प्रमोद सावंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पावर उपाय काढला पाहिजे, या मतावर आपण ठाम आहे. फामेंतो आणि मडगाव नगरपालिकेमधील प्रकरण सरकारतर्फे सोडवण्यात येणार आहे. लोकहितासाठी सोनसोडो प्रकल्प गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे देण्यासाठी मी वैयक्तिकरीत्या फोमेंतोच्या अध्यक्षांसोबत बोलून विनंती करणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी दिली.

मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पर्वरीतील सचिवालयातील परिषदगृहात आयोजित करण्यात आलेल्या सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उच्च स्तरीय समितीची आणि बायंगिणी येथील नियोजित घनकचरा व्यवस्थापन सुविधांसंबंधित बैठक पार पडली. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो, नगर विकासमंत्री मिलिंद नाईक, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत अनेक नेते आणि वरिष्ठ अधिकारी सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत उपस्थित होते. ॲड. पडियार यांनी कायदेशीर पैलूंची आणि सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबतची सविस्तर माहिती दिली. लेविन्सन मार्टीन्स यांनी प्रकल्पाच्या सध्याच्या स्थितीची माहिती दिली. तसेच सोनसोडो प्रकल्पाच्या कार्याची माहिती दिली. बैठकीत बायगिणी घनकचरा व्यवस्थापन सुविधा, निधी पुरविणे आणि इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.