
>> द्वारकानाथ संझगिरी
विराटच्या संघाने जी दक्षिण आफ्रिकेची वाताहत केली ती पाहून माझ्या लहानपणी माझी आई दगडी पाटय़ावर वरवंटय़ाने चटणी वाटायची त्याची आठवण झाली.
बऱ्याचदा आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचा कसोटी सामना पाहतोय यावर माझा विश्वासच बसेना. जे घडलं त्याला ‘मॅच’ किंवा ‘सामना’ म्हणणे म्हणजे हिमेश रेशमियाला सवयीने गायक म्हणण्यासारखं आहे. नवीन चेंडूची काही षटकं संपल्यावर सामना किंवा मॅच या शब्दांचे खरे अर्थ गळून पडत. त्यानंतर बाद होणारे हिंदुस्थानी फलंदाज ‘स्वकर्माने’ बाद होत. त्यांना बाद केलं जात नसे. बरं फलंदाजीच्या वेळी दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज असा गरबा खेळत की जणू त्यांच्या ‘सपोर्ट स्टाफ’मध्ये फाल्गुनी पाठकला मोलाची कामगिरी दिलीय असं वाटावं. जसप्रीत बुमराच्या आठवणीने एकही शिंक आल्याचं स्मरत नाही. उमेश यादव आला. त्याने नव्या बॉलने धुमाकूळ घातला. शमीसाठी तर बुफे होता. मटण कुर्मा, मूर्ग मस्सलन, खिम्यावर ताव मारायचा हे त्याने ठरवायचं होतं. पूर्वी असं व्हायचं की, आपल्याकडे आपण ‘आखाडे’ तयार करायचो आणि मग फिरकी गोलंदाज त्यांचा विकेटचा बँक बॅलन्स धडाधड वाढवून घेत. बेदी, चंद्रा, प्रसन्नापासून अश्विन, जाडेजापर्यंत हे अव्याहत सुरू होतं. यावेळी जिंकायला त्याची गरज पडली नाही. फिरकी गोलंदाजांना ‘शिळं अन्न’ मिळायचं. अमक्या गोष्टीमुळे आम्ही हरलो असं म्हणायला वावच हिंदुस्थानी संघाने त्यांना दिला नाही. आता तो एल्गर हॉटेलच्या खाण्याबद्दल काहीबाही म्हणाला म्हणे. ती शाब्दिक ‘वांती’ होती. पराभव न पचल्यामुळे झालेली. खूप वर्षांपूर्वी मद्रासमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज कोसळायला लागल्यावर मद्रासी बायकांच्या रंगीत साडय़ा त्यांचा कर्णधार बिल लॉरीला खुपल्या होत्या आणि हो एक काळ होता तेव्हा हिंदुस्थानी हॉटेल्स किंवा तिथल्या जेवणावर तोंडसुख घेणे ही परदेशी कर्णधारांची स्टाइल होती, पण आता हिंदुस्थानपेक्षा चांगली पंचतारांकित हॉटेल्स त्यांच्या देशातही नाहीत.
पण ही मालिका मला कशी वाटली ते सांगतो. तुम्ही कधी आफ्रिकेच्या जंगलात सिंहाला शिकार करताना पाहिलंय? तो सिंह शिकार शोधून हरण किंवा झेब्य्राचा पाठलाग करीत असताना पाहणाऱ्याला चेव चढतो. हा चेव सिंहाच्या झडपेपर्यंत तसाच राहतो. त्याने त्या प्राण्याला रक्तबंबाळ केलं की आपली सहानुभूती त्या शिकार झालेल्या प्राण्याकडे जाते. ही मालिका त्या हरणा किंवा झेब्य्राएवढी मला एकाकी आणि असहाय्य वाटली. समोरून प्रतिकार नसला की रंगत निघून जाते. तसं झालं. 1959 साली हिंदुस्थानी संघ सहा महिने इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी सहा महिन्यांचा दौरा असे. प्रत्येक कौंटीबरोबर दोनदा मॅच आणि पाच कसोटी सामने. तो असा इंग्लिश उन्हाळा होता ज्या वर्षी पावसाने दगा दिलाच नाही. हिंदुस्थानी संघाने पाच कसोटी सामन्यांसह कौंटी सामन्यातही मानहानीकारक पराभव स्वीकारला. त्यावेळी एका इंग्लिश क्रिकेट चाहत्याने सुभाष गुप्तेंना सांगितलं होतं, ‘यू हॅव स्पॉइल्ड अवर ब्रिलिएंट समर’. मला तसंच डय़ुप्लेसीला सांगावसं वाटतंय, ‘यू हॅव स्पॉइल्ड अवर फेस्टिव सिझन.’
पण हिंदुस्थानी फलंदाज आणि गोलंदाजांसाठी हे सर्व सणाचे दिवस होते. धावा आणि विकेटस्ची गंगा अंगणी आली होती. का ते सण साजरा करणार नाहीत? आयुष्यात रोज अशी संधी मिळते असं नाही. बऱ्याचदा दुष्काळाच्या दिवसांतून जावं लागतं.
रोहित शर्माला अगदी योग्यवेळी आघाडीला जायची संधी मिळाली. त्याने संधीचं सोनं केलं. मॅचच्या पहिला अर्धा तास तो गोलंदाजांना द्यायचा. बाकी सर्व तास त्याचे होते. सुरुवातीच्या स्विंगच्या मोहात त्याची बॅट फक्त एकदाच अडकली. त्यानंतर त्याला रोखणे म्हणजे समुद्राच्या लाटांना उसळू नका असं सांगण्यासारखं होतं. उसळणं हा त्याचा गुणधर्म होता. तो त्याने पाळला. उसळणाऱ्या समुद्रानेही स्तिमित होऊन हेवा करावा असं रोहित शर्माचं उसळणं होतं. पूल, ड्राइव्ह, पंच, कट सर्वच फटके पाटाच्या पाण्यासाखे वाहत होते. एक रबाडा सोडला तर त्या पाण्याला बांध घालणारा कोण होता आफ्रिकेकडे? त्यांचे फिरकी गोलंदाज पाहून माझे हात शिवशिवत होते, तर ड्रेसिंग रूममध्ये काय झालं असेल? लहानपणी कधी तरी एक वाक्य माझ्या मनावर कोरलं गेलं होतं. ‘A stroke maker may fail once, may fail twice, but he cannot fail allways. And success of the stroke maker is the greatness of the game” रोहितच्या फलंदाजीने ते वाक्य पुन्हा मनाच्या पृष्ठभागावर आणलं.
मयांक अगरवालने निव्वळ धावांच्या सिमेंटने आपली जागा घट्ट करून टाकली. त्यामुळे पृथ्वी शॉ हे नाव आठवणीतून जायची भीती वाटायला लागली. विराट कोहलीने संधी मिळाल्यावर एक विराट खेळी केली अणि चार विक्रम त्याच्या बॅटला बिलगले. त्याच्या फलंदाजीतली आजची ‘फेज’ अशी आहे की त्याला विक्रमाकडे जायला लागणार नाही. ते धावत त्याच्याकडे येणार. रहाणेने मधल्या फळीतली आपली जागा पक्की केली, पण त्याने विराट-रोहितकडून एक धडा घ्यावा. सेट झाल्यावर ते दोनशेचे टार्गेट समोर ठेवतात तसं त्यानं ठेवावं. विकेट हे हृदय नाही की जे सुंदर मुलगी दिसली की द्यावं. ते सत्यवानाचे प्राण आहेत. सावित्रीप्रमाणे प्रयत्न करून यमालाही गुडघे टेकायला लावणारे. आपल्या विकेटकडे त्याने तसं पाहिलं पाहिजे. पुजारा स्वतःवर चरफडला असेल. धावा वाहत असून घ्यायला त्याला एक मोठा हंडा सापडू नये? आत येणारा चेंडू त्याचा वारंवार घात करतोय हे त्याच्या चाणाक्ष बुद्धीला सतावत असेल.
हिंदुस्थानी संघाच्या धावांच्या ओझ्याखाली दक्षिण आफ्रिकन संघ कोसळला तरी त्याचं क्रियाकर्म हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजांनी केलं. तेही स्वतःच्या पाटासदृश खेळपट्टीवर हे मला त्यांचं मोठे यश वाटतं. फलंदाजांइतकं त्यांचं कौतुक कधी होत नाही, पण मला ही गोष्ट मोठी वाटते.
मला काहीजण म्हणाले, काय गोलंदाजी होती दक्षिण आफ्रिकेची? या धावांना किती किंमत द्यायची? होय धावांचा सेल लागला होता. पण रोहित, विराट, अजिंक्य किंवा मयांकची काय चूक? की त्यांनी अशी संधी सोडावी? एक नक्की की, या धावांची नशा डोक्यात जाऊ देऊ नये. पुढच्या प्रत्येक दुकानात सेल लागेलच असा नाही, पण आजचा दिवस एन्जॉय करा. एन्जॉय बॉईज.
दृष्टिक्षेपात
- हिंदुस्थानने या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचे 60 फलंदाज बाद केले. दक्षिण आफ्रिकेला मात्र टीम इंडियाचे 25 फलंदाजच बाद करता आले. दोन्ही संघांचा फलंदाजांना बाद करण्याचा फरक 35 ठरतो. तीन सामन्यांच्या मालिकेचा विचार करता हा फरक चौथ्या क्रमांकाचा ठरत आहे. याआधी चार मालिकांमध्ये यापेक्षा जास्त फरक दिसून आला आहे.
- हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी या मालिकेत 22.84 च्या सरासरीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना बाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना मात्र हिंदुस्थानी फलंदाजांना बाद करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले. त्यांची सरासरी होती 75.44 इतकी. हा फरक 52.60 इतका ठरला. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा फरक पाचव्या स्थानावर झेप घेतोय.
- हिंदुस्थानच्या पहिल्या पाच फलंदाजांनी 91.05 च्या सरासरीने धावा केल्या. दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना फक्त 17.10 च्या सरासरीने धावा करता आल्या. हिंदुस्थानच्या फलंदाजांनी सहा वेळा शतकापेक्षा जास्त धावांची भागीदारी रचली. दक्षिण आफ्रिकेला फक्त एकदाच शतकी भागीदारी करता आलीय.
संक्षिप्त धावफलक
- हिंदुस्थान पहिला डाव
- 9 बाद 497 धावा
- द. आफ्रिका पहिला डाव
- सर्व बाद 162 धावा
- द. आफ्रिका दुसरा डाव
- सर्व बाद 133 धावा
- सामनावीर – रोहित शर्मा
- मालिकावीर – रोहित शर्मा



























































