
जम्मू-कश्मीरच्या पुलवामा जिह्यात झालेल्या चकमकीत हिंदुस्थानी जवानांनी जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यातील दोन जण पाकिस्तानी असल्याचा संशय आहे.
पुलवामाच्या अवंतीपुरामधील राजपुरा गावात एका घरात दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यावरून मंगळवारी दुपारीच राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-कश्मीर पोलीस, एसओजी आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली. राजपुरात येणारे-जाणारे सर्व रस्ते बंद केले गेले.
दहशतवादी लपलेल्या घराला जवानांनी घेरताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यात ते मारले गेले. त्यांच्याजवळ शस्त्रसाठा आणि स्फोटके आढळली. या चकमकीचा 1 मिनिट 54 सेकंदांचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. त्यात दहशतवाद्यांकडून एका घरातुन गोळीबार केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे. त्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न व्हायला हवेत, असे पाकचे म्हणणे होते. काही राजकीय पुढारी व पत्रकारांना एलओसी परिसराचा दौरा करायचा आहे असे सांगण्यात आले होते. हिंदुस्थानने पाकच्या या भूमिकेवर सकारात्मक प्रतिसादही दिला होता. मात्र सोमवारची रात्र उलटताच पाकिस्तानने पुन्हा मंगळवारी सीमेवर कुरापती काढल्या. पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. शाळा असलेल्या परिसरात गोळीबार करण्यात आला. या स्थितीत पाकवर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल हिंदुस्थानी लष्कराशी संबंधित सूत्रांनी उपस्थित केला आहे.
नौशेरात लष्करी अधिकारी शहीद
दरम्यान, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरून 500 मीटर अंतरावर असलेल्या सुरक्षा दलाच्या चौकीवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. त्यात एक लष्करी अधिकारी शहीद झाला.
पाक विमानांच्या घिरटय़ा
हिंदुस्थानने पाकव्याप्त कश्मीरात केलेल्या कारवाईनंतर दोन्ही बाजूने मोठय़ा प्रमाणात हालचाली सुरू आहेत. पाकव्याप्त कश्मीरात पाक हवाई दलाची विमाने घिरटय़ा घालताना दिसल्यामुळे उत्तरेकडील सीमाभागात हिंदुस्थानी लष्कर सतर्क झाले आहे. पंजाबमध्ये होशियारपूर परिसरात हिंदुस्थानी हवाई दलाची विमाने सज्ज ठेवण्यात आली आहेत. अतिमहत्त्वाच्या ठिकाणांवरही सतर्कता बाळगण्यात येत आहे, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली.

























































