चाकराला पडचाकर! एकच सुपारी पाच गुंडांकडे फिरली आणि पोलिसांकडून झाला पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधिक

दुसऱ्यावर विसंबून राहण्याची सवय अनेकांना असते. पण, ही सवय एखाद्याला जेलमध्येही पाठवू शकते. खोटं वाटतं? पण हे खरं आहे. दुसऱ्यावर विसंबून राहण्याच्या पद्धतीमुळे एका प्रकरणातील पाच भाडोत्री गुंड पोलिसांच्या हाती लागले आहेत.  एका सुपारीमुळे पाच गुंडांचा पर्दाफाश झाल्याची विचित्र आणि तितकीच विनोदी घटना घडली आहे.

ही घटना चीनमधील असून हे प्रकरण उघड झाल्यानंतर अनेकांना या गमतीदार घटनेमुळे हसु आलं आहे. त्याचं झालं असं की, तान युहुई नावाच्या एका चिनी व्यावसायिकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याला संपवण्याचा निश्चय केला. त्याच्या हत्येची सुपारी त्याने एका गुंडाला दिली. या सुपारीची किंमत 2,83,000 डॉलर इतकी निश्चित झाली. पण, या गुंडाने आळशीपणामुळे दुसऱ्याच गुंडाला हे काम करण्यासाठी दिलं. मिळालेल्या रकमेच्या निम्मी रक्कम देऊन त्याने सौदा पक्का केला. पण हा दुसरा गुंडही आळशी निघाला. त्यानेही हे काम तिसऱ्या गुंडाला दिलं. चाकराला पडचाकर या न्यायाने तिसऱ्याकडून चौथ्याकडे आणि चौथ्याकडून पाचव्याकडे आलं. सुपारीची रक्कम दर गुंडागणिक कमी होत गेली.

या सगळ्या सावळ्यागोंधळात दुसऱ्या गुंडाला यात काहीतरी काळंबेरं असावं अशी शंका आली. त्याला आपल्यानंतर अजून तीन जणं या प्रकरणात गुंतणं आवडलं नाही आणि त्याने थेट पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तपास केल्यानंतर खरी गोष्ट उघड झाली. पोलिसांनी या पाचही गुंडांना आणि त्यांना सुपारी देणाऱ्या व्यावसायिकाला अटक केली. पहिल्या गुंडाने जर हे काम स्वतःच केलं असतं तर ही वेळ आली नसती. पण, या गुंडांनी काम पुढच्यावर ढकललं आणि ते पकडले गेले. आता यातले पाचही गुंड आणि व्यावसायिक यांना न्यायालयाने कडक शिक्षा दिल्या आहेत.