
पावसामुळे झेंडू व शेवंतीच्या फुलांचे मोठे नुकसान झाले असून यंदाच्या दिवाळीत फुलांचे भाव अचानक कोसळले आहेत. झेंडूला किलोमागे अवघा एक रुपया भाव मिळाल्याने शेतकर्यांनी रस्त्यावर फुले फेकत संताप व्यक्त केला. शेतकरी आज पावसामुळे चांगलाच हवालदिल झाला आहे. पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला असतानाचा मालाला दर मिळत नसल्याने शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला आहे.
नगर आणि पारनेर तालुक्यात दसरा, दिवाळी या सणाच्या सात महिने अगोदर झेंडू, शेवंतीसह अन्य फुलांचे उत्पादन घेतले जाते. परंतु यंदा या फुलांना भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी सुमारे 5 ते 7 हजार हेक्टरवर शेतकर्यांनी झेंडूसह अन्य फुलांचे उत्पादन घेतले असून या तालुक्यातून नगरसह पुणे, मुंबईला फुले विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात जातात. दुष्काळात पारनेर तालुक्यातील शेतकर्यांनी टँकरचे विकत पाणी घेऊन फुलांच्या बागा जगवल्या होत्या. परंतू आता सर्व काही पाण्यात गेले असल्याचे चित्र आहे. मात्र, ज्यावेळी विक्रीसाठी हातात फुले येणार होती, त्याच वेळी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. या फुलांवर घाला घातला असून शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. पारनेर तालुक्यात परतीचा पाऊस सुरू आहे. पावसाचा सर्वाधिक फटका फुलांना बसला आहे. बागांमध्ये पाणी साचल्याने फुले सडली, तर काही भागात फुले गळून पडली आहेत. बाजारात झेंडूला किलोमागे 1 रुपयाचा दर मिळाल्याने शेतकर्यांनी संतापून झेंडूची फुले बाजार समितीच्या रस्त्यावर फेकून दिली. तर काही शेतकर्यांनी बाजार समितीतच जनावरांपुढे फुले टाकली.


























































