
जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. तो कौल अंतःकरणपूर्वक स्वीकारून सक्षम विरोधकांची भूमिका बजावणार असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केला. आम्ही सत्ता स्थापन करणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बारामतीत गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत पवार व थोरात यांची चर्चा झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, नवनिर्वाचित आमदार रोहित पवार उपस्थित होते.
सत्ता स्थापन करणे किंवा तिसरा पर्याय निर्माण करणे हा आमच्यापुढे प्रश्न नसल्याचे सांगत शरद पवार म्हणाले, जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. तो कौल स्वीकारून सक्षम विरोधकांची भूमिका बजावणार आहे. भविष्यात जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातात हात घालून काम करतील.
राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांची बुधवारी मुंबईत बैठक
येत्या बुधवारी (दि. 30) दुपारी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलावली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
राज्यात सत्ता स्थापन करण्यासंबधी शिवसेनेने आमच्याकडे कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. आम्हीही त्यांच्याकडे कोणताही प्रस्ताव ठेवलेला नाही. शिवसेनेकडून प्रस्ताव आला तर मला दिल्लीला विचारावे लागेल. आमचे निर्णय दिल्लीतून होतात, परंतु सध्या तरी आम्ही विरोधी पक्षातच बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे थोरात यांनी सांगितले.
ही फक्त दिवाळी भेट – थोरात
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, बारामतीत पवारांची घेतलेली भेट ही दिवाळीनिमित्त होती. आम्ही अनेक वर्षांपासून दिवाळीला पवारांची भेट घेत असतो. त्यामुळे या भेटीत वेगळे काहीही नाही. सत्ता स्थापन करण्याचा विषय आमच्यापुढे नाही. त्यामुळे त्या विषयावर चर्चा करण्यात अर्थ नाही. पवार यांनीही यापूर्वीच या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. आम्ही विरोधात बसून चांगले काम करायचे ठरवले आहे. आदर्श विरोधक म्हणून आम्ही काम करू. विरोधी पक्षनेते पदाबाबतही अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसच्या विधी मंडळ सदस्यांची दिवाळीनंतर मुंबईत बैठक होईल. राष्ट्रवादीची बैठक होईल. त्यानंतर आम्ही एकत्रित बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ.




























































