जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष निघाला बँकचोरांचा म्होरक्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकांना टीव्हीवरची एका मिंट चॉकलेटची जाहिरात अनेकांना आठवत असेल. त्या जाहिरातीत बँकेचा रखवालदारच बँकेवर दरोडा घालतो, असं दाखवलं होतं. तसाच काहीसा प्रकार प्रत्यक्षातही घडला आहे. बँक लुटणाऱ्या टोळीला पकडल्यानंतर तिचा म्होरक्या जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष निघाल्याची घटना घडली आहे.

न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारच्या मोतिहारी पोलिसांनी दरोडेखोरांच्या एका टोळीला अटक केली. या टोळीने मोतिहारी आसपासच्या अनेक जिल्ह्यांमध्ये बँकेवर दरोडे घातले होते. शस्त्राचा धाक दाखवून बँकेला लुटायचं ही या टोळीची नेहमीची पद्धत होती. पोलिसांनी या टोळीला पकडण्यासाठी छापेमारीही केली. त्यात ती टोळी म्होरक्यासह पकडली गेली. पंकज ठाकूर असं या दरोडेखोरांच्या म्होरक्याचं नाव आहे. पंकजची ओळख पटवत असताना पोलिसांना आणखी एक धक्कादायक माहिती समजली.

विविध बँकांमध्ये लुटमारी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या पंकज हा वैशाली इथल्या जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असल्याचं पोलिसांना समजलं. जवळपास डझनभर बँकांना लुटण्याचा कारनामा केलेल्या पंकजने वैशालीमधूनच आपली टोळी जमवली होती. त्या टोळीच्या मदतीने त्याने हे दरोडे घातले. पोलिसांनी या संपूर्ण टोळीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.