बीसीसीआयशी ‘पंगा’ घेऊ नका! अनुराग ठाकूर यांचा आयसीसीला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाच्या म्हणजेच हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सहकार्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अस्तित्वच अधुरे आणि अर्थहीन आहे. कारण आयसीसीच्या महसुलातील 75 टक्के वाटा हिंदुस्थानी बोर्डच आपल्या उत्पन्नातून देते. त्यामुळे बीसीसीआयला ठेंगा दाखवत आपल्याला कारभार करता येईल या भ्रमात आयसीसीने राहू नये, असे खडे बोल बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी जगातील शिखर क्रिकेट संघटनेला सुनावले आहेत.

हमीरपूरमधील सांसद महाकुंभ मेळय़ातील पारितोषिक वितरण सोहळय़ासाठी ठाकूर आपल्या मतदारसंघात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी हिंदुस्थानची अडवणूक कराल तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. कारण बीसीसीआयच तुम्हाला सर्वाधिक महसूल देतेय असे आयसीसीला बजावले आणि बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरभ गांगुली आयसीसीकडून आपला न्याय्य वाटा मिळवतील असा विश्वासही केंद्रीय राज्यमंत्री ठाकूर यांनी व्यक्त केला.

खेळाने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो
खेळाने व्यक्तित्वाचा विकास होतो. शिवाय चारित्र्यसंपन्न नेतृत्व घडवण्यात क्रीडा क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे अशा शब्दांत अनुराग ठाकूर यांनी युवकांनी मोठय़ा संख्येने खेळाकडे वळावे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन हमीरपूरच्या सांसद स्टार खेळ महाकुंभच्या पारितोषिक वितरण सोहळय़ात बोलताना केले. हमीरपूरच्या या खेळ महाकुंभात 1400 संघांचे 42 हजार 700 क्रीडापटू सहभागी झाले आहेत. बीसीसीआयच्या कारभाराशी आपला थेट संबंध नसला तरी या संघटनेच्या माध्यमातूनच मी मोठा झालोय. त्यामुळे अडीअडचणीच्या वेळेस संघटनेला सल्ला देणे मी माझे कर्तव्यच मानतो असे ठाकूर यांनी शेवटी सांगितले.