जगातील सर्वाधिक कर्तृत्ववान CEO मध्ये हिंदुस्थानी वंशाच्या तिघांनी पटकावले स्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्ती जगभरात देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर पोहचण्यासोबतच ते आपले कर्तृत्वही सिद्ध करत आहेत. हॉवर्ड बिजनेस रिव्हूने नुकत्याच प्रकाशित केलेल्या जगातील सर्वात कर्तृत्ववान सीईओंच्या यादीत हिंदुस्थानी वंशाच्या तिघांनी स्थान पटकावले आहे. शंतनु नारायण, अजय बांगा आणि सत्या नडेला यांना या यादीत पहिल्या 10 जणांमध्ये स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे अॅमझॉनचे सीईओ जेफ बेजॉस यांना या यादीत स्थान मिळालेले नाही.

हॉवर्ड बिजनेस रिव्हूने ( एचबीआर) तयार केलेल्या ‘द बेस्ट परफॉर्मिंग सीईओ इन द वर्ल्ड 2019’ या यादीत जगभरातील 100 कर्तृत्ववान साईओंचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत अमेरिकी टेक्नोलॉजी कंपनी एनविडियाचे सीईओ जेनसेन हुवांग प्रथम स्थानावर आहेत. तर हिंदुस्थानी वंशाचे अडोब कंपनीचे सीईओ शंतनु नारायण यादीत सहाव्या स्थानावर आहेत. तर मास्टरकार्डचे सीईओ अजय बांगा सातव्या स्थानावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे सीआओ सत्या नडेला यादीत नवव्या स्थानावर आहेत. तर हिंदुस्थानात जन्म झालेले डीबीएसचे सीईओ पियूष गुप्ता 89 व्या स्थानावर आहेत.

अॅपलचे सीईओ टिम कूक यादीत 62 व्या स्थानावर आहेत. नाइकचे सीईओ माइक पार्कर 20 व्या, जेपी मॉर्गनचे सीईओ जॅमी डिमोन 23 व्या, लॉकहिड मार्टिनचे सीईओ मॅरिलीन ह्यूसन 37 व्या स्थानावर, डिज्नीचे सीईओ रॉबर्ट इगर 55 व्या तर सॉफ्टबँकचे सीईओ मासायोशी सन 96 स्थानावर आहेत. अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजॉस 2014 च्या यादीत प्रथम स्थानावर होते. आर्थिक निकषांच्या आधारावर त्यांनी हे स्थान पटकावले होते. मात्र, यंदा अॅमेझॉनकडून चमकदार कामगिरी झाली नसल्याने यंदाच्या यादीत बेजॉस यांना स्थान मिळवता आलेले नाही.