टॉप 10 सीईओंच्या यादीत तिघा हिंदुस्थानींची चमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक पातळीवर विविध क्षेत्रांत हुकमत गाजवणाऱया हिंदुस्थानींनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱया मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओंच्या यादीतही आपले वर्चस्व सिद्ध केले. जगभरातील पहिल्या दहाजणांमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या शांतनू नारायण, अजय बंगा आणि सत्या नाडेला यांनी स्थान पटकावले. या त्रिमूर्तीने ‘हार्वर्ड बिझनेस रिह्यू’ (एचबीआर)ने तयार केलेल्या यादीमध्ये हिंदुस्थानची चमक दाखवून दिली.

कंपनीच्या प्रगती आलेख उंचावण्यासाठी वर्षभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या जगभरातील 100 सीईओंची यादी एचबीआरने तयार केली. ‘द बेस्ट परफॉर्मिंग सीईओ इन द वर्ल्ड 2019’ या नावाने ही यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यात अडोबचे शांतनू नारायण सहाव्या स्थानावर, तर मास्टरकार्डचे सीईओ अजय बंगा हे सातव्या स्थानावर आहेत. त्याचबरोबर मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांनी यादीत नववा क्रमांक पटकावला. डीबीएसचे सीईओ आणि हिंदुस्थानात जन्मलेले पीयूष गुप्ता यांचे या यादीत 89 वे स्थान आहे.

नाव मोठे, यादीत थिटे
यादीत वरचा क्रमांक पटकावण्यात बडय़ा कंपन्यांचे सीईओ कमी पडले. ऍपलचे सीईओ टीम कूक 62 व्या क्रमांकावर फेकले गेले. त्याचबरोबर नाइकचे माईक पार्कर 20 व्या स्थानावर, जेपी मॉर्गन चेजचे प्रमुख जॅमी डिमोन 23 व्या स्थानावर, लॉकहीड मार्टिनचे सीईओ मॅरिलिन ह्यूसन 37 व्या स्थानावर, डिज्नीचे रॉबर्ट इगर 55 व्या, तर सॉफ्टबँकचे मासायोशी सन हे 96 व्या स्थानावर आहेत. गेल्या पाच वर्षांत वित्तीय कामगिरीच्या जोरावर यादीत आघाडीचे स्थान पटकावणाऱया ऍमेझॉनचे जेफ बेजॉस यांना यंदा यादीबाहेर राहावे लागले आहे.

चार महिलांचा समावेश
यादीतील सुरुवातीच्या 50 क्रमांकांमध्ये चार महिला सीईओंचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या यादीत तीन महिलांनी स्थान पटकावले होते, तर 2017 च्या यादीत दोन महिला होत्या. तीन वर्षांत महिला सीईओंचा यादीतील टक्का वाढत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.