
विदर्भातील अकोला आणि अमरावती जिह्यात बुधवारी वीज कोसळल्याच्या तीन घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. अमरावती जिह्यातील अचलपूर-परतवाडा मार्गावरील आसेगाव पूर्णा गावाजवळ वीज कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू तर तिघे जखमी झाले. अकोला जिह्यातील तेल्हारा व अकोट तालुक्यात वीज कोसळल्याने चार जण ठार तर तिघे जखमी झालेत. तिन्ही घटनांमध्ये सहा जण जखमी झाले आहेत.
अमरावतीमध्ये मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली आश्रय घेतलेल्या नागरिकांवर वीज कोसळल्याने तिघांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले. ही घटना अचलपूर-परतवाडा मार्गावरील आसेगाव पूर्णाजवळ घडली. सोनाली गजानन बोबडे (35, रा बोपापूर), शोभा संजय गाठे (45, राअचलपूर) व सय्यद निजामोद्दीन सय्यद बदरोद्दीन (65, राअंजनगाव सुर्जी) अशी मृतकांची नावे आहेत. बुधवारी दुपारी जिह्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने दुचाकीने अचलपूरकडे जाणाजया काही नागरिकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी आसेगाव पूर्णा परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांचा आश्रय घेतला दरम्यान एका झाडाखाली सहा जण उभे असता वीज कोसळली. यात सोनाली बोबडे, शोभा गाठे व सय्यद निजामोद्दीन यांचा मृत्यू झाला तर त्यांच्यासोबतचे तीन जण जखमी झालेत सोनाली या बडनेरातील माळीपुरा येथे राहणारा भाऊ स्वप्निल ज्ञानेश्वर वाठ (29) याच्यासोबत अचलपूरला जात होत्या. शोभा गाठे या अमरावती येथील पीडीएमसी रुग्णालयात दाखल नातेवाईकाला भेटून भावासोबत अचलपूरला जात होत्या. तर सय्यद निजामोद्दीन हे मुलासोबत अंजनगाव सुर्जीला जात होते. वीज कोसळल्यानंतर सर्व सहा जणांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले
अकोल्यामध्ये तेल्हारा तालुक्यातील वरूड भोकर शिवारात कापूस वेचणीचे काम सुरू असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी शेतातील मजूर बांधावरील झाडाखाली थांबले असता वीज कोसळली. यात गणेश मोकळकार, गजानन अढाऊ व लक्ष्मी अढाऊ यांचा मृत्यू झाला. तर नागोराव अढाऊ, वैष्णवी अढाऊ गंभीर जखमी झाले. वीज कोसळल्याची दुसरी घटना अकोट तालुक्यातील लाडेगाव शिवारात घडली. या घटनेत एक शेतमजूर जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. मृत शेतमजुराचे नाव दादाराव पळसपगार आणि जखमीचे नाव अनिल पंचाग आहे. जखमी अनिल पंचागला अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.


























































