
दिल्लीतील 16 डिसेंबर 2012 च्या निर्भया बलात्कार प्रकरणातील मुकेश, अक्षय, पवन आणि विनय या चार आरोपींनी सात दिवसांत राष्ट्रपतींकडे आपले ‘दया अर्ज’ सादर न केल्यास त्यांच्या फाशीच्या अंमलबजावणीची प्रक्रिया तात्काळ सुरु केली जाईल असा सक्त इशारा तिहार तुरुंग प्रशासनाने चौघा आरोपींना दिला आहे.
16 डिसेंबर 2016 च्या मध्यरात्री दिल्लीतील युवतीला बसमधून इच्छितस्थळी सोडण्याच्या निमित्ताने बस चालकासह सहा जणांनी तिच्यावर पाशवी बलात्कार केला होता. या प्रकरणातील निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर मुकेश, अक्षय, पवन आणि विनय या चार आरोपींना साकेत जलदगती न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. दिल्ली उच्च न्यायालयानेही आरोपींची आव्हान याचिका फेटाळत 14 मार्च 2014 ला त्यांच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर 9 जुलै 2018 ला सर्वोच्च न्यायालयानेही या चौघा आरोपींची फेरयाचिका फेटाळत त्यांच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे आता सात दिवसांत राष्ट्रपतींकडे दया अर्ज दाखल न केल्यास आम्हाला चौघा गुन्हेगारांना फाशी द्यावे लागेल असा फतवा तिहार तुरुंग प्रशासनाने काढला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बसचालक राम सिंह याने तिहार तुरुंगातच गळफास घेत आत्महत्या केली, तर सहावा अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात 3 वर्षे शिक्षा भोगून मुक्त झाला आहे.
तिघे तिहार तुरुंगात, तर चौथा मंडोली जेलमध्ये
दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणात फाशी ठोठावण्यात आलेले तिघे तिहार तुरुंगात तर चौथा दोषी मंडोली तुरुंगात जेरबंद आहे. या चौघांच्या फाशीवर सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींकडे दया अर्ज करणे एवढाच शिक्षा कमी होण्याचा पर्याय त्यांच्यापुढे आहे. पण त्यासाठी आता सातच दिवस उरल्याची माहिती तिहार तुरुंगाचे महानिदेशक संदीप गोयल यांनी दिली.
























































