
हिंदुस्थानचे महान पंच माधव गोठोस्कर यांचा 91 वा वाढदिवस 30 ऑक्टोबरला साजरा करण्यात आला. याप्रसंगी दैनिक ‘सामना’शी संवाद साधताना त्यांनी आठवणींना उजाळा दिला. ते यावेळी म्हणाले, क्रिकेट या खेळाने मला सर्व काही दिले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे क्रिकेट या खेळावर अपार प्रेम होते. मीही त्या काळात मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये सदस्य होतो. त्यादरम्यान मला त्यांचा सहवास लाभला. हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही, असे भावुक उद्गार यावेळी त्यांनी काढले.
1948 च्या दरम्यान इंदूरला असताना सी. एस. नायडू, सी. के. नायडू, मुश्ताक अली या महान व्यक्तींना भेटण्याचा योग आला. त्यानंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये नोकरी करीत असल्यामुळे सराव लढतीमध्ये पंच म्हणून काम करीत होतो. मात्र रितसर परीक्षा दिल्यानंतर कसोटी पंच म्हणून निवडला गेलो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पंच म्हणून काम करताना प्रचंड आनंद झाला. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये पंच परीक्षक व प्रशिक्षक म्हणूनही काम केले, असे त्यांनी पुढे सांगितले.
1990 साली मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्या वतीने मला ‘क्रीडा समीक्षक’ म्हणून पुरस्कार देण्यात आला. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते तो पुरस्कार देण्यात आला. हा क्षण माझ्यासाठी संस्मरणीय ठरला. पंच संघटनेकडूनही मला मानपत्रही देण्यात आले.
माझ्या आयुष्यात पत्नी व मुले यांना अनन्यासाधारण महत्त्व आहे. त्यांच्यामुळे मला पुढे जाण्याचे प्रोत्साहन मिळाले. शिवाजी पार्क जिमखान्याचा (एसपीजी) मी 22 वर्षे पदाधिकारी होतो. त्यांचाही माझ्या जीवनात मोलाचा वाटा आहे.
मला संगीताची आवड आहे. तसेच तबलाही वाजवत असे. पं. भीमसेन जोशी, माणिक वर्मा, हिराबाई बडोदेकर यांची गाणी मला मनापासून आवडतात.





























































