सरकार कधी येणार? हतबल मुख्यमंत्री म्हणाले, येईल लवकरच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे परतीच्या पावसामुळे कापणीला आलेले पीक हातून गेल्याने राज्यातले शेतकरी हवालदिल झालेले असताना शेतकऱयांची विचारपूस करायला आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आज हतबल झालेले दिसले. राज्यात सरकार कधी स्थापन होणार, या प्रश्नावर त्यांनी ‘लवकरच’ एवढेच उत्तर दिले.

अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज अकोल्यात आले होते. पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारी मदतीचा आढावा घेतला आणि उपययोजनांची माहितीही दिली. पत्रकारांनी नव्या सरकारच्या स्थापनेबाबत विचारले तेव्हा ते म्हणाले, लवकरात लवकर सरकार स्थापन करणे गरजेचे आहे. शेतकऱयांना मदत करताना काळजीवाहू सरकारला मर्यादा येतात. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी शेतकऱयांना चांगली मदत हवी असेल तर 6 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के पंचनामे करा, असे आवाहनही त्यांनी अधिकाऱयांना केले. आता या विधानाचेही राजकीय अर्थ काढले जात आहेत.

मुख्यमंत्र्यांनी अकोल्यातील लाखनवाडा, चिखलगाव आणि म्हैसपूर गावांतील पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. पावसाने सोयाबीन, ज्वारी, कापूस, मूग अशा सर्वच पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले.