उरणमधील नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी, शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचे भातकापणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्यावतीने सोमवारी उरण तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जसखार गावकऱ्यांना वीजेमुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेण्यात आली. जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी उरण पुर्व विभागातील ओला दुष्काळ पाहणी दौऱ्या दरम्यान विविध भागातील भातशेतीच्या नुकसानीची आणि मच्छिमार नुकसानीची पाहणी केली. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या अडचणीतील शेतकरी आणि मच्छिमारांसोबत संवाद साधून त्यांच्या व्यथा आणि समस्या जिल्हा प्रमुख भोईर यांनी जाणून घेतल्या. अवकाळी पावसामुळे राज्यात नैसर्गिक आपत्ती उद्भवली आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि मच्छिमारांनी खचून न जाण्याचे आवाहन करीत शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा ठाम विश्वास माजी आमदार भोईर यांनी दिला.

शेती पिकांचे पंचनामे करुन तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या जाव्यात. तसेच बहुतांश भागात जास्त पाऊस झाल्याने शेती पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने झालेल्या पीकांचे पंचनामे सरसकट होणे आवश्यक आहे व यांचे पंचनामे करून ताबड़तोब शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी मागण्यांचे निवेदनही उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या कडे देण्यात आले.