#Ayodhya Verdict कायदा हातात घेणाऱ्यांची गय करणार नाही, शहरात प्रचंड फौजफाटा तैनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुढील आठवड्यात राम जन्मभूमीचा निकाल अपेक्षित असल्याने संभाजीनगर शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ‘शहरवासियांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करावा. शहरात कायदा सुव्यस्था राहावी यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कायदा हातात घेऊन शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

अयोध्येतील राम जन्मभूमी जागेचा निकाल सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यातील 17 नोव्हेंबरच्या सुमारास जाहीर करणार आहे. या निकालानंतर शहरात कोणत्याही समाजाच्या नागरिकांनी जल्लोष करू नये अथवा कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील अशा व्हिडिओ क्लिप, फोटो, संदेश सोशल मीडियावर व्हायरल करू नयेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा हातात घेणाऱ्याची गय केली जाणार नाही, असा इशारा देत चिरंजीवप्रसाद यांनी पुढे सांगितले की, निवडणुकीच्या काळात शेकडो गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यामुळेच मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या आहेत.

दरम्यान, अयोध्येतील निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात साडेतीन हजार पोलिसांची प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला असून, अतिरिक्त बंदोबस्तदेखील मागविण्यात आला आहे. शहरात संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असून सोशल मीडियावरील विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर, फेसबुकवरही पोलिसांचे विशेष लक्ष असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. सोशल मीडियावरून आक्षेपार्ह संदेश, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर भादंवि 188 नुसार आणि सायबर अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे देखील पोलीस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, डॉ. राहुल खाडे, मीना मकवाना, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे आदींची उपस्थिती होती.