शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण, मुंबई ते जयपूर… जोरबैठकांचा धडाका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले 17 दिवस सुरू असलेली महाराष्ट्राच्या राजकारणातील धावपळ शनिवारी अयोध्या खटल्याच्या सुनावणीमुळे थांबल्यासारखी वाटली होती, पण तो स्वल्पविरामच होता. कारण राजकारणात रविवारची सुट्टी नसते हेच खरे. आज मुंबईपासून जयपूरपर्यंत दिवसभर राजकीय जोरबैठकांचा धुरळा उडाला.

सत्तास्थापनेचा दावा करायचा की नाही याचा निर्णय घेण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीला ‘वर्षा’वर दोनदा बैठक घ्यावी लागली. तर जयपूरच्या रिसॉर्टमध्ये मुक्कामाला असलेल्या काँग्रेस आमदारांशी दिल्लीतील नेत्यांनी संवाद साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मालाडच्या ‘रिट्रिट’ हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांची भेट घेतली आणि मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही संध्याकाळी ‘सिल्व्हर ओक’वर प्रफुल्ल पटेल यांच्याशी गुप्तगू केले. दिवसभर असा सिलसिला सुरू असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी बैठक आटोपून भाजप नेत्यांसह थेट राजभवनावर पोहचले आणि पुरेसे संख्याबळ नसल्याने आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही अशी स्पष्ट कबुली त्यांनी राज्यपालांकडे दिली. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले असून सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी सोमवारी सायंकाळी साडेसातपर्यंतची मुदत दिली आहे. या निमंत्रणानंतर राजकीय घडामोडींना आता कमालीचा वेग येणार आहे हे नक्की!